
कोकण आणि रायगडासाठी गुरुवारचा दिवस हा अत्यंत वाईट ठरला. रायगडात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी धडकली होती. यापाठोपाठ कणकवलीतही अपघात झाल्याची बातमी धडकली. गडनदी पुलावर बस उलटल्याने 4 जणांचा मृत्यू झाल्याचे कळते आहे. या अपघातात 23 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कणकवलीत आरामबस उलटून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजिक खासगी बसला हा अपघात झाला. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून गडनदी पुलावरील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. ही बस मुंबईहून गोवाच्या दिशेने जात होती.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथे पहाटे भीषण अपघात झाला आहे.#Raigad #Mangaonhttps://t.co/zJHZipsNwA
— Saamana (@SaamanaOnline) January 19, 2023
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगावजवळच्या रेपोली येथे पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. गाडी आणि ट्रक समोरसमोर धडकून हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.
माणगावपासून जवळच रेपोली इथं पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. येथे महामार्गावर विरुद्ध बाजूने येणारा ट्रक समोरून येणाऱ्या इको गाडीला धडकल्याने ही दुर्घटना घडली. या टकरीनंतर गाडीचा संपूर्ण चक्काचूर झाला. तर गाडीतील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. गोरेगाव पोलीस तातडीने अपघात स्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केलं आहे.