मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर प्रश्नचिन्ह? 20 टक्केहून अधिक शिक्षक मतदार यादीतून गायब

मुंबई विद्यापीठांतर्गत विविध विभागांचे 30 टक्के विभागप्रमुख आणि इतर सुमारे 20 टक्केहून अधिक शिक्षकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. हे शिक्षक विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असून याविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन (बिदाता) संघटनेने आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

मागील 20 ते 25 वर्षांपासून कार्यरत असलेले शिक्षक, विभागप्रमुखांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी मतदार यादीत सुधारणा करण्याची मागणी करत ‘बिदाता’ संघटनेने आज आझाद मैदानात एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करून विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले. यात संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश शेंद्रे, उपाध्यक्ष डॉ. अरुण पाटील, डॉ. भटू वाघ, डॉ. महेंद्र दहिवले, डॉ. सुनील दहिवले यांच्यासह शिक्षक, विभागप्रमुखांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मुंबई विद्यापीठाने नुकताच पदवीधर वगळून प्राचार्य, संस्थाचालकांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि व्यवस्थापन परिषदेच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी 7 जूनपासून मतदारसंघातील उमेदवारांना अर्ज करता येतील, तर या उमेदवारांची यादी 19 जूनपर्यंत जाहीर होणार आहे. मात्र यात प्रचंड मोठय़ा प्रमाणात शिक्षक आणि विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱया विभागप्रमुखांनाच मतदार यादीमधून वगळण्यात आल्याने यावर ‘बिदाता’ संघटनेने आक्षेप घेतले आहेत.

– विद्यापीठ प्रशासनाकडून 597 शिक्षकांची, तर 683 विभागप्रमुखांपैकी 294 विभागप्रमुखांची नावे मतदार यादीतून वगळली आहेत.