संगीत व गायन क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मंगळवारी ही घोषणा करण्यात आली. शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रकाश बुद्धीसागर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
संगीत रंगभूमीवरील विशेष योगदानाबद्दल संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव शुभदा दादरकर यांना तर संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल दिला जाणारा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारासाठी शशिकला झुंबर सुव्रे (2023), जनार्दन वायदंडे (2024) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने या पुरस्कारांची शिफारस केली आहे.
रोहिणी हट्टंगडी यांचा चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी गौरव
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची यावेळी घोषणा करण्यात आली असून चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना गौरविण्यात येणार आहे. नाटक विभागासाठीचा पुरस्कार विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत वर्गवारीत डॉ. विकास कशाळकर, कंठसंगीत प्रकारातील पुरस्कार सुदेश भोसले यांना घोषित झाला आहे. लोककला क्षेत्राचा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर, शाहिरी क्षेत्रातील पुरस्कार शाहीर राजेंद्र कांबळे, नृत्यातील पुरस्कार सोनिया परचुरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील पुरस्कार संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात नागेश सुर्वे (ऋषीराज), तमाशा वर्गवारीतील पुरस्कार कैलास सावंत, तर आदिवासी गिरीजन वर्गवारीमध्ये शिवराम शंकर धुटे यांची निवड करण्यात आली.
पुरस्कारांच्या रकमेत वाढ
जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत गतवर्षीपासून दुप्पट वाढ करण्यात आली असून पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे होते; ते आता रुपये दहा लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे झाले आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असून या पुरस्काराचे स्वरूप रुपये तीन लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे झाले आहे.