अजून 90 वर्षे गाणार! आशा भोसले ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित

रसिकहो, तुम्ही सगळय़ांनी आम्हा कलाकारांना मोठं केलं आहे. तुमच्याशिवाय आम्ही अशक्य! असेच प्रेम द्या. मी अजून 90 वर्षे गाणार…अशा भावना वयाच्या नव्वदीत ज्येष्ठ गायिका ‘पद्मविभूषण’ आशा भोसले यांनी व्यक्त केल्या. हा ‘महाराष्ट्र भूषण’ माझ्या मते ‘भारतरत्न’ आहे. माझ्या घरच्या माणसांनी दिलेला हा पुरस्कार आहे! त्यांना माझी आठवण आहे म्हणून मला हा पुरस्कार दिलाय, असे आशा भोसले म्हणाल्या.

गेली आठ दशके आपल्या सुरांनी जग जिंकणाऱ्या आणि तमाम संगीतप्रेमींच्या जीवनात आनंदनिधान आणणाऱ्या आशाताईंना राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. 2021 सालचा हा पुरस्कार आहे. 25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर, मीना खडीकर, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, संगीतकार आनंदजी, अभिनेत्री शबाना आझमी, तनुजा, टीना अंबानी, पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लो, श्रद्धा कपूर, अभिनेते जॅकी श्रॉफ, मधुर भांडारकर, अनु मलिक, उदित नारायण, सचिन पिळगावकर, वंदना गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘आवाज चांदण्याचे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हे तर माहेरचं कौतुक…
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना आशा भोसले म्हणाल्या, माई, बाबा आणि दीदीच्या आशीर्वादाने भव्यदिव्य सोहळय़ात ‘ताज’च्या समोर ऐतिहासिक वास्तूत हा पुरस्कार मला दिला जातोय. मुलगी बरेच दिवसांनी माहेरी आल्यावर तिचे कौतुक होते. तिच्या डोक्यावरून, पाठीवरून मायेचा हात फिरवला जातो. तिचे कौतुक होते. आज मला माहेरी आल्यासारखे वाटतेय. यावेळी आशा भोसले यांनी ज्यांच्यासोबत काम केले असे अनेक संगीतकार, गायक, कलाकार आणि रसिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.