माणसांत देव पाहते – वैशाली माडे

गायिका वैशाली माडे. तिला भेटलेली चांगली माणसं, तिचे गुरू, निसर्ग आणि तिचं गाणं या सर्वांमधील देवत्व तिला भावते.

> आपलं आवडतं दैवत? – माझ्या आयुष्यात भेटलेला प्रत्येक माणूस ज्याने मला चांगलं पाहायला, विचार करायला शिकवलं, चांगलं गायला शिकवलं ते सगळेच जण माझ्यासाठी देवाच्या रूपात आली आहेत.

> त्यांचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? – माणसात देव असतो. म्हणून त्यांच्याविषयी मनात असलेलं प्रेम हेच त्यांचं कौतुक. ज्याला मनातली सल सांगून मन हलकं करावंसं वाटतं तोच माझ्यासाठी देव आहे.

> संकटात तो तुम्हाला कशी मदत करतो, असं वाटतं? – जन्मापासून मृत्यूपर्यंत होणारी प्रत्येक गोष्ट घडताना त्यामध्ये अडथळे आहेतच. यामध्ये एकमेकांना समजून घेणं, सांभाळून घेणं, मदत करणं यामधूनच देवनिर्मिती होते. माणसाच्या रूपातच देव धावून येतो. काल्पनिक देवावर माझा विश्वास नाही.

> कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? – कलाकाराचं सर्वात जवळचं नातं देवाशी असतं. कारण त्याच्या कलेत एवढी शक्ती असते की, त्याला निसर्गाला बदलण्याची ताकद असते. एखादी तान प्रयत्न करून आल्यानंतरचा जो आनंद स्वतःत अनुभवायला मिळतो. कलाकाराच्या साधनेतच भक्ती आहे.

> तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते? – आपल्या कलेशी एकरूप होणं म्हणजे देवाशी एकरूप होणं. गाण्याला शरण गेल्यावरच ते आपल्याला येतं. हीच देवाची एकरूपता आहे.

> त्याच्यावर रागावता का? – कधीच नाही, कारण तक्रारी असतात त्या स्वतःबद्दलच असतात. बऱ्याच संघर्षानंतर संगीतक्षेत्रात स्वतःसाठी चांगली जागा निर्माण करण्याची शक्ती माझ्यामध्ये आली. त्यामुळे सगळय़ा गोष्टींसाठी मीच जबाबदार आहे.

> देवबाप्पा तुमचे लाड कसे पुरवतो? – मला वाटलं आणि देवाने द्यावं, असा कधीच विचार करत नाही. जे दिलंय त्यात मी खूश आहे. एखाद्या गोष्टीची अपेक्षा करणं सोडलं की ती गोष्ट आपसूकच तुमच्यापर्यंत येते. नको त्या गोष्टींमागे धावण्यापेक्षा रियाज करण्याकडे लक्ष देते. यामुळे गाणं टिकतं.

> त्याच्यापाशी काय मागता? – ज्या कामासाठी माझा जन्म झालाय ते काम सार्थकी लागावं. आता मी थोडीशी स्थिरावलेय. ज्या लोकांना माझी गरज आहे, जे अतिशय दुर्बल घटक आहेत, अशा लोकांना माझी मदत व्हावी, अशी माझी इच्छा आहे.

> कोणता नैवेद्य दाखवता? – गावी महाशिवरात्रीला गोड फुलांचा नैवेद्य दाखवतात.  ही फुले प्रसाद म्हणून वाटतात. ती फुले खायला मला आवडतात.

> त्याची नियमित उपासना कशी करता?- उपासनेऐवजी रियाज करते. दररोज माझ्या गुरूंच्या पाया पडते. तिथे माझी साधना पूर्ण होते.