डोळ्यातून बुब्बुळ आले बाहेर, शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचवला महिलेचा डोळा

1005

पालिकेच्या लोकमान्य टिळक शीव रुग्णालयात कोरोना रुग्णांबरोबरच ‘नॉन कोविड’ रुग्णांवर मोठ्या प्रमाणावर उपचार सुरू आहेत. यामध्ये शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसंगावधान आणि तत्परता दाखवून शस्त्रक्रिया केल्याने एका महिलेचा डोळा वाचवल्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

आयटी क्षेत्रात कार्यरत असलेली सीमा नावाची ४३ वर्षीय महिला नवी मुंबई येथे वास्तव्यास आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सध्या त्या घरूनच काम करीत होत्या. एके दिवशी रात्री ती आपल्या घरात अचानक पाय घसरून पडली. यामध्ये टेबलवर आदळल्याने तिच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. यातच तिने चष्मा घातला असल्यामुळे दुखापत आणखी गंभीर झाली. डोळ्यात रक्ताच्या गाठी झाल्या. त्यामुळे तातडीने कुटुंबीयांनी त्यांना नवी मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाही रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही. त्यामुळे सीमा यांना पालिकेच्या शीव रुग्णालयात आणले गेले. या ठिकाणी तातडीने आवश्यक तपासण्या करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. नेत्र विभागाच्या डॉक्टरांनी तातडीने निर्णय घेऊन ही शस्त्रक्रिया केल्यामुळेच डोळा वाचल्याचे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल सांगितले. शीव रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांवरही उपचार सुरू असल्याचे डॉ. भारमल म्हणाले. १९० हून जास्त कार्डियाक प्रोसिजर करण्यात आल्या असून इतर विभागात उपचार, शस्त्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.

अक्षरश: बाहेर लटकत होते बुब्बुळ
सीमा यांच्या डोळ्यातील बुब्बुळ अक्षरश: बाहेर लटकत होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रक्रिया तातडीने कशी करणार असा प्रश्न होता. मात्र प्रोफेसर डॉ. नयना पोतदार आणि ऑक्युप्लास्टिक सर्जन डॉ. गुंजन राठी यांच्या नेतृत्वाखाली नेत्ररोग तज्ज्ञांच्या टीमने जबाबदारी घेत तातडीने आवश्यक प्रकिया करून शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत अक्षरश: बाहेर लटकणारे बुब्बुळ शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या बसवून डोळा वाचवला. यानंतर काही दिवस झूम अ‍ॅपच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या