‘सिरम’ तयार करणार पाच कोरोना लसींचे 100 कोटी डोस!

सिरम इन्स्टिटय़ुट ऑफ इंडियाकडून कोरोनावरील पाच वेगवेगळ्या लसींचे 100 कोटी डोस तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सिरम’चे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली. दरम्यान, कोरोनाचे संक्रमण जगात 20 वर्षे राहील. तोपर्यंत लसीची गरज लागणार आहे असे त्यांनी सांगितले.

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीची देशात तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे. 1600 स्वयंसेवकांवर ही चाचणी होत आहे. कोविशिल्ड लसीचे डोस निर्माण करण्यापासून सुरुवात करणार असल्याचे पुनावाला यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. कोविशिल्डसह कोवोवॅक्स, कोविक्वॅक्स, कोवीवॅक आणि एसआयआय-कोवॅक्स या पाच लसींचे उत्पादन सिरम करणार आहे. 2021 च्या प्रत्येक तिमाहित किमान एक लस लाँच करण्याचा प्रयत्न आहे. 2022 वर्ष सुरू होण्यापूर्वी 100 कोटी डोस तयार करण्याचा सिरमचा प्रयत्न असल्याचे पुनावाला यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या