अमरावतीत हत्येचा थरार, आई-वडील घराबाहेर गेले अन मोठ्या बहिणीने धाकट्या भावाला आडवे केले

3107

अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील व्यंकटेश कॉलोनीमध्ये राहत असलेल्या एका 21 वर्षीय तरुणीने आपल्याच सख्ख्या लहान भावाची हत्त्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका दहा वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृतकाचे आई-वडील गुरुवारी काही कामानिमित्य बाहेर गेले होते. त्यामुळे घरात बहीण-भाऊ हे दोघेच खेळत होते. खेळता खेळता दोघांचे काही कारणावरून भांडण झाले असता 21 वर्षांच्या बहिणीने आपल्या लहान भावाच्या डोक्यात थेट खलबत्त्याने वार केला. या नंतर भाऊ हा गंभीर जखमी झाला व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी खोलापुरी गेट पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे आपल्या पथकासह घटनास्थळी पोचले. घटनेचा पंचनामा करीत मृतकाचे शव जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. पोलिसांनी आरोपी बहिणीच्या विरोधात हत्येच्या गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या