नाशिकच्या हुसेन रुग्णालयात सिस्टर्सकडून कोरोनाग्रस्तांना रक्षाबंधनाची अविस्मरणीय भेट

788

गेल्या चार महिन्यांपासून दिवसरात्र रुग्णसेवा करणार्‍या नाशिकच्या डॉ. हुसेन रुग्णालयातील परिचारिकांनी राखीपौर्णिमेनिमित्त कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना राख्या बांधून बहिणीच्या मायेचे बंध अधिक घट्ट केले. पीपीई किट परिधान करून हे अनोखे ‘रक्षाबंधन’ साजरे झाले. कोविडशी झुंजणार्‍या या रुग्णालयाने मोठ्या कालावधीनंतर एक आनंद सोहळा अनुभवला.

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात सोमवारी सकाळच्या सत्रातील परिचारिका थोड्या लवकरच कामावर हजर झाल्या. मेट्रन संध्या सावंत यांनी स्वखर्चातून राख्या आणि मिठाईची खरेदी केली. नेहमीप्रमाणे कोविड कक्षात जाण्यापूर्वी त्या सार्‍याजणींनी पीपीई किट परिधान केले. त्या कोविड कक्षात दाखल झाल्या, तेव्हा त्यांच्या हातातील औक्षणाचे तबक पाहून रुग्ण भारावून गेले. परिचारिकांनी राख्या बांधून औक्षण करीत मिठाई दिली. आज सणाच्या दिवशी घरी नसल्याने जाणवणारे एकटेपण या सोहळ्यामुळे दूर पळाले. सर्वांना या संकटकाळात माणुसकीच्या नात्याचे हे रूप समाधान देवून गेले. इन्चार्ज सिस्टर आशा कापडणे, नीता धात्रक, स्टाफ नर्स शीतल मर्ढेकर, सुष्मा चौरे, सरला भालेराव आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला.

हा आनंद शब्दातीत

रक्षाबंधनावेळी रुग्णांच्या चेहर्‍यावर दिसलेला आनंद शब्दात मांडता येणारा नाही. अनेकांना अश्रू अनावर झाले होते, असे मेट्रन संध्या सावंत म्हणाल्या. हुसेन रुग्णालयात सध्या कोरोनाची तीव्र लक्षणे असलेले 60 रूग्ण आहेत. इतर आजारांमध्ये रुग्णाला नातेवाईक भेटू शकतात. मात्र, कोरोनाबाधितांना भेटता येत नाही, त्यामुळे येथे रक्षाबंधन साजरे करीत आनंद आणि सकारात्मक संदेश देता आला, असे नोडल अधिकारी आवेश पलोड म्हणाले.

खर्‍या कोरोना योद्ध्या

परिचारिकांनी रक्षाबंधन साजरे केल्याचा आनंद आहे. मार्चपासून 39 परिचारिका रुग्णसेवेत तत्पर आहेत. कठीण काळात त्यांच्यासह डॉक्टर व कर्मचार्‍यांनी दिलेले योगदान मोठे आहे. आतापर्यंत आठ सिस्टर्स कोरोनाबाधित झाल्या, योग्य उपचाराअंती कोरोनाला हरवून त्या पुन्हा कर्तव्य बजावत आहेत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी सांगितले.

आतापर्यंत साडेतीन हजार रुग्णांवर उपचार

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तसे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून हुसेन रुग्णालयात कोविडग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. चार महिन्यात साडेतीन हजार पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार झाले. सध्या येथील चार कोविड आणि दोन संशयितांच्या कक्षात 123 रुग्ण दाखल आहेत, त्यात 108 पॉझिटिव्ह आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या