दिवसभर ‘एवढे’ तास बसून राहणाऱ्यांना मृत्यू लवकर गाठतो!

1262

दिवसभर साडे नऊ तासांपेक्षा अधिक काळ बसून राहणाऱ्या लोकांना मृत्यू लवकर गाठतो. हा धक्कादायक अहवाल ब्रिटिश मेडिकल जर्नल (बीएमजे) प्रसिद्ध केला आहे. ‘लोकमत न्यूज‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

नॉर्वेतील ओस्लो येथील ‘नॉर्वेजियन स्कूल ऑफ स्पोर्ट सायंसेज’चे प्रोफेसर उल्फ एकेलुंड यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी शारिरीक हालचाल आणि मृत्यू यावर अभ्यास केला. यासाठी त्यांनी ‘एक्सेलेरोमीटर’चा वापर केला. हे एक असे उपरकरण आहे जे जागे असताना आणि जोपलेले असताना हालचालींचे प्रमाण आणि तीव्रतेचा अभ्यास करते. शोधप्रबंधांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की दिवसभरातील झोपेचे क्षण वगळता जे लोक साडे नऊ तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ बसून राहतात त्यांना मृत्यू लवकर गाठण्याची शक्यता असते.

शोधकर्त्यांनी कमीत कमी 40 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या 36383 लोकांचा अभ्यास केला. यांचे सरासरी वय 62 वर्ष होते. या सर्वांच्या हालचालींवर सरासरी 5.8 वर्ष नजर ठेवण्यात आले. या दरम्यान अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्यापैकी तब्बल 2149 लोकांचा मृत्यू झाला. यात त्यांना असे आढळून आले की शारिरीक हालचाल कमी करणाऱ्यांना मृत्यूने लवकर गाठले आहे. तसेच जे लोक दिवसभरात 300 मिनिटं अर्थात पाच तास विविध प्रकारच्या शारिरीक हालचाली करतात (भांडी घासण्यापासून ते व्यायमापर्यंत) त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण कमी आहे. कोणतेही शारिरीक परिश्रम न करणाऱ्या लोकांचा मृत्यू लवकरच झाल्याचे निदर्शनास आले.

डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्वानुसार 18 ते 64 वर्ष वयोगताली लोकांनी आठवडाभरात 150 मिनिटं मध्यम किंवा 75 मिनिटं अंत्यत कठोर शारिरीक परिश्रम करायला हवी. प्रत्येक वयानुसार यात शारिरीक परिश्रम कमी जास्त करण्याचा सल्ला डब्ल्यूएचओने दिलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या