मित्राच्या खांद्यावर बसून 3 किमी अंतर पार करून नवरा पोहोचला विवाह मंडपात

लग्नासाठी नवरा घोड्यावर बसून जातो, पण एका लग्नासाठी तयार झालेल्या नवऱ्याला मात्र त्याच्या मित्राने खांद्यावर बसवून 3 किमी अंतर चालत न्यावे लागले. बिहारमधील पुरैना गावात ही मजेशीर घटना घडली आहे.

बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील डुमराव उपविभाग मुख्यालयापासून 20 किमी. अंतरावर वसलेल्या पुरैना गावात गेल्या काही दिवसांत अवेळी पाऊस पडला. या पावसामुळे रस्त्यावर भरपूर चिखल जमा झाला. त्यामुळे या गावातील रस्त्यांवरून कोणतेही वाहन चालवणे शक्य होत नव्हते. नेमके याच वेळी गावातील एका तरुणाचे लग्न ठरले होते. रस्यावर जमा झालेल्या चिखलामुळे त्याला घोड्यावर बसवून नेणे शक्य होईना, याकरिता नवऱ्याला त्याच्या मित्राने खांद्यावर बसवून विवाहस्थळी 3 किलोमीटर अंतर पायी चालत नेले.

पावसामुळे गावातील रस्त्यांवर चिखल जमा होण्याची समस्या अनेक वर्षांपासून आहे. यामुळे येथून गाड्यांची वाहतूकही बंद होते. अशावेळी लोकांना रस्त्यावर जमा झालेला चिखल तुडवतच गावातील मुख्य रस्त्यावर यावे लागते. गावक-यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडे या समस्येबाबत अनेक वेळा तक्रार केली, पण त्याचा काही उपयोग होत नाही, असे गावातील लोक सांगतात.

थोडासा पाऊस पडला तरी गावातील रस्त्यांवरून चालता येणार नाही, एवढा चिखल रस्त्यांवर जमा होत असल्यामुळे पुरैना गावात पावसाळ्यात कधीच लग्न होत नाहीत, पण जर वर पक्षाकडील मंडळींना ही गोष्ट मान्य नसेल तर नाईलाजाने पावसाळ्यातच लग्न करावे लागते. अवेळी पाऊस पडल्याने गावचा रस्ता चिखलाने भरला. त्यामुळे नवऱ्याला खांद्यावर बसवून लग्न मंडपापर्यंत न्यावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या