श्रीलंका – न्यूझीलंड यांच्यातील गॉल कसोटी सहा दिवसांची

पुढच्या महिन्यात श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात गॉलवर खेळला जाणारा कसोटी सामना पाच नव्हे, तर सहा दिवसांचा असेल. श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक असल्यामुळे कसोटीच्या चौथ्या दिवशी दोन्ही संघांना विश्रांती देण्यात आली आहे. हा कसोटी सामना 18 ते 23 सप्टेंबरदरम्यान खेळविला जाणार आहे.

श्रीलंकन क्रिकेटच्या इतिहासात दोन दशकांनंतर प्रथमच सहा दिवसांचा कसोटी सामना खेळविला जाणार आहे. याआधी 2001 साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळला गेलेला सामना पोया डे (पौर्णिमा) निमित्ताने सहा दिवसांचा खेळविण्यात आला होता. ही आगामी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा भाग आहे.

दुसरा कसोटी सामना 26-30 सप्टेंबरला खेळविला जाईल. विसाव्या शतकात कसोटीत एक दिवस विश्रांतीचा असायचा, पण विसाव्या शतकाच्या अखेरीस ही परंपरा खंडित झाली. बांगलादेशनेही 2008 साली लोकसभा निवडणुकीमुळे श्रीलंकेविरुद्धचा कसोटी सामना सहा दिवसांचा करत एक दिवस विश्रांतीचा ठेवला होता.