सोलापूर जिह्यातील सहा तालुके कोरोनामुक्त

सोलापूर जिह्यात एप्रिल 2020 मध्ये दाखल झालेला कोरोना आता तिसऱ्या लाटेनंतर परतीच्या वाटेवर असल्याचे दिसून येते. जिह्यात सध्या 45 रुग्ण सक्रिय असून, अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर व सांगोला या सहा तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नसल्याने हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.

सोलापूर जिह्यातील दोन लाख 21 हजार 656 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बाधित व मृतांची संख्या अधिक होती. प्रतिबंधित लसीकरणानंतर कोरोनाचा धोका कमी झाला आणि बाधितांची संख्याही रोडावली. लसीकरणामुळे नागरिकांमधील कोरोनाची भीतीदेखील कमी झाली आहे. अजूनही शहरात कोरोना झालेल्या 31 व्यक्ती असून, त्यात 17 महिला व 14 पुरुष आहेत, तर ग्रामीणमध्ये 10 महिला व चार पुरुष उपचार घेत आहेत.

आता कोरोनाबाधित रुग्ण पाच-सहा दिवसांत बरा होऊ लागला आहे. त्याला तीव्र तथा मध्यम स्वरूपाची लक्षणेसुद्धा नाहीत. संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या आणि अनेकांचा आधार हिरावणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि आता प्रतिबंधित लस या उपायांमुळे कोरोना विशेषतः मृत्यू नियंत्रणात आले आहेत. ग्रामीण भागातील बहुतेक लोक अजूनही कोरोनातील नियमांचे तंतोतंत पालन करीत असल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिह्यातील सहा तालुके कोरोनामुक्त झाले असून, चार तालुके कोरोनामुक्तीच्या उंबरठय़ावर आहेत. सध्या बार्शी व माळशिरस तालुक्यांत प्रत्येकी तीन, तर करमाळा व माढा तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण आहेत, तर मंगळवेढय़ात चार रुग्ण आहेत. आगामी काही दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त  होईल, अशी सद्यःस्थिती आहे. दिलासादायक बाब म्हणजे बार्शी व करमाळा ग्रामीणमध्ये, तर माढा, माळशिरस शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

दोन महिन्यांपासून एकाचाही मृत्यू नाही

ऑगस्ट 2020 व 2021 मध्ये जिह्यातील प्रत्येक व्यक्तीची चिंता वाढविणारा कोरोना 2022 च्या ऑगस्टमध्ये शांत असल्याची स्थिती आहे. 12 वर्षांवरील सर्वांनाच कोव्हॅक्सिन, कार्बोव्हॅक्स व कोविशिल्ड लसीचे ठराविक अंतरानंतर तीन डोस दिले जात आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिह्यात मागील दीड-दोन महिन्यांत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.