बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवा सहा वेगवेगळ्या पध्दतीने

घरोघरी बाप्पाच्या आगमानासाठी सरबराई सुरू आहे. यातही बाप्पाला प्रिय असलेल्या मोदकांमध्ये कशाप्रकारे नावीन्य आणावे याची चिंता महिलांना आतापासूनच सतावू लागली आहे. त्यांच्यासाठीच काही खास मोदकांचे विविध प्रकार आपण पाहणार आहोत.

1. रवा मोदक 
साहित्य – 1 वाटी रवा, अर्धी वाटी  गुळ, 1 चमचा वेलची पावडर, दिड वाटी किसलेला नारळ, एक वाटी दुध, एक चमचा तुप, गरजेनुसार पाणी.

कृती –
1) प्रथम मध्यम आचेवर किसलेला नारळ व गुळ परतुन घ्यावा. (नारळाचा किस फ्रिजमध्ये ठेवुन घट्ट करुन घ्यावा जेणे करुन सारणाचा छान गोळा तयार  होतो.)
2) नारळाचा किस सुटेपर्यंत होईपर्यंत व गुळ वितळेपर्यंत मिश्रण सतत ढवळत राहावे.
3) त्यानंतर मिश्रणात वेलची पावडर घालावी. सहा ते सात मिनिटे मिश्रण शिजू द्यावे.
4) तयार झालेले सारण गॅस बंद करुन थंड होण्यास ठेवावे.
5) आवरण तयार करण्यासाठी सर्व प्रथम रवा मंद आचेवर 7-8 मिनिटे परतावा.
6) रव्याचा रंग हलकासा गुलाबी झाल्यावर गॅस बंद करुन रवा प्लेट मध्ये काढुन घ्यावा.
7) त्यानंतर मध्यम आचेवर कढई ठेवावी. त्यात थोडे पाणी व दुध गरम करावे.
8) त्यात एक चमचा तुप घालावे.
9) दुध उकळायला लागल्यावर त्यात भाजलेला रवा घालावा व मिश्रण सतत ढवळत रहावे.
10) 2/3 मिनिटांमध्ये मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होते. गॅस बंद करुन ते मिश्रण प्लेट मध्ये काढुन घ्यावे.
11) रव्याचे मिश्रण चांगले मळुन घ्यावे.
12) रव्याच्या मिश्रणाची पारी तयार करुन त्यात गुळ खोबऱ्याचे सारण भरावे व त्याचा मोदक तयार करावा.

rava-modak

2. तिळाचे मोदक –
साहित्य – 1 वाटी तीळ, 2 चमचे तुप, पाव वाटी दुध, अर्धी वाटी गुळ, पाव वाटी दुध

कृती –
1) सर्व प्रथम मंद आचेवर 3/4 मिनिटे तीळ भाजुन घ्यावे.
2) तीळ भाजुन झाल्यावर ते थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढुन ठेवावे.
3) तीळ थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये वाटुन घ्यावे (हवी असल्यास तीळाची पावडर पण करु शकता)
4) मध्यम आचेवर तुप गरम करा.
5) तुपामध्ये गुळ घालुन सतत ढवळा.
6) गुळ वितळु द्यावा. (तुप व गुळाचे मिश्रळ उकळु देऊ नये, नाहीतर मोदक कडक होऊ शकतात.)
7) गुळ पुर्णपणे वितळल्यावर त्यात तीळ घालावे.
8) मिश्रण चांगले परतावे व गॅस बंद करावा.
9) तयार झालेले मिश्रण थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढुन घ्यावे.
10) मिश्रण कोरडे वाटल्यास त्यात गरजेनुसार दूध घालुन मळुम घ्यावे.
11) मोदकाच्या साच्यामध्ये तयार सारण भरुन मोदकाचा आकार देऊन मोदक तयार करुन घ्यावे.

til-modak

 3. पनीर मोदक –
साहित्य – 2 वाट्या किसलेले पनीर, 1 वाटी कन्डेन्स मिल्क, 1 चमचा वेलची पुड, केशर, 1 चमचा तुप

कृती –
1) सर्व प्रथम पनीर चांगले कुस्करुन घ्यावे.
2) तवा मध्यम आचेवर गरम करुन पनीर परतुन घ्यावे.
3) त्यात वेलची पुड घालवी.
4) पनीरच्या मिश्रणात कन्डेन्स मिल्क घालावे.
5) मिश्रणाचा गोळा तयार होईपर्यंत सतत ढवळत रहावे.
6) तयार झालेले मिश्रण प्लेटमध्ये काढुन घ्यावे.
7) मोदकाच्या साच्याला तुप लावुन त्यात तयार मिश्रण भरुन मोदक तयार करावेत.

panir-modak

 4. ड्राय फ्रु़टस् मोदक
साहित्य – बदाम, काजु, पिस्ता, मनुके (सर्व सम प्रमाणात), पाव किलो खजुर, अर्धी वाटी सुके खोबरे, एक चमचा तुप

कृती –
1) मंद आचेवर बदाम, काजु, पिस्ता भाजुन घ्यावा.
2) मिक्सरमध्ये बदाम, काजु, पिस्ता, मनुके, खजुर व सुके खोबरे वाटुन घ्यावे.
3) गरज वाटल्यास चिकटपणा येण्यासाठी 1 चमचा पाणी घालावे, व पुन्हा वाटावे.
4) मोदकाच्या साच्याला तुप लावुल तयार झालेले मिश्रण साच्यात भरुन मोदक तयार करावे.

dry-fruits-modak

 5. नारळाचे मोदक
साहित्य – 1 किसलेला नारळ, पाऊण डबा कन्डेन्स् मिल्क, 2 चमचे गुलाब पाणी, 1 वाटी चॉकलेट, 1 चमचा तुप

कृती –
1) प्रथम एका भाड्यात नारळ घ्या.
2) पाऊण डबा कन्डेन्स् मिल्क टाका.
3) त्यात 2 चमचे गुलाब पाणी टाका.
4) सर्व मिश्रण एकत्रित करुन घ्या.
5) मोदकाच्या साच्याला तुप लावा.
6) साच्यामध्ये तयार मिश्रण भरुन मोदक तयार करुन घ्या.
7) चॉकलेट वितळवुन घ्या.
8) वितळलेल्या चॉकलेटमध्ये तयार केलेल्या मोदकांमाचा अर्धा भाग बुडवा व फ्रिजमध्ये 20 मिनिटे सेट होण्यासाठी ठेवा.

coconut-modak

 6. पेढा मोदक
साहित्य – केशर, पाव वाटी दूध, किसलेला मावा, 1 वाटी साखर, 1 चमचा तुप

कृती –
1) सर्वप्रथम कोमट दूधात केशर भिजवुन घ्या.
2) किसलेला मावा मध्यम आचेवर परतवा.
3) माव्यामध्ये साखर घालुन ती वितळे पर्यंत मिश्रण ढवळत राहा.
4) केशर घातलेले दूध मिश्रणात घाला.
5) तयार झालेल मिश्रण 4-5 मिनिटे शिजवा.
6) मिश्रणाचा गोळा तयार झाल्यावर गॅस बंद करा.
7) मोदकाच्या साच्याला तुप लावा व त्यात तयार मिश्रण भरुन मोदक तयार करा.
( तयार मिश्रण पुर्णपणे थंड होऊ देऊ नका.)

pedha-modak

 

आपली प्रतिक्रिया द्या