
छत्तीसगडच्या बीजापूर जिह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 6 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. या कारवाईत मोठ्या प्रमातात शस्त्रसाठा व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी सांगितले की, बीजापूर जिह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानातील जंगलात ही चकमक उडाली. एका ठिकाणी नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली. अनेक तास दोन्ही बाजुने मोठा गोळीबार सुरू होता. अखेर 6 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले. मोहीम अजूनही सुरू आहे, असे यादव यांनी सांगितले. नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटविण्यात आलेली नाही.
बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, सध्या माओवादी चळवळ दिशाहीन आणि नेतृत्वहीन झालेली आहे. काही तळांपूरतीच ती मर्यादित आहे. मोहीम सुरूच असून परिसराला घेरण्यात आले आहे. पळून गेलेल्या नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे.
यावर्षी 259 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी कारवाईत यश मिळाले आहे. आत्तापर्यंत 259 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी विविध चकमकीत ठार केले आहे. त्यापैकी 230 नक्षलवादी हे एकट्या बस्तर विभागत ठार केलेले आहेत.
























































