दक्षिण मुंबईतील सहारा मार्केटमधील मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात मोबाईलचे आयएमईआय नंबर बदलणार्‍या सहा जणांच्या टोळीचा गोरखधंदा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसांनी त्या दुकानावर छापा टाकून आयएमईआय नंबर बदलण्यासाठी लागणार्‍या वेगवेगळ्या सॉफ्टवेअर किटस् आणि हजार मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.

सहारा मार्केटमधील एका मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात मोबाईलचे आयएमईआय नंबर बदलून दिले जात असल्याची खबर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार, उपनिरीक्षक योगेश भोसले व पथकाने ट्रप लावून त्या दुकानात एक डमी ग्राहक पाठवला. मग त्या डमी ग्राहकाने आयएमईआय नंबर बदलण्याची विनंती करीत दुकानदारांकडे दोन मोबाईल दिले. त्यानंतर प्रत्येक मोबाईलसाठी 500 रुपये लागतील असे सांगत दुकानदारांनी दोन्ही मोबाईल आयएमईआय नंबर बदलण्यासाठी घेतले. त्या मोबाईलचे आयएमईआय नंबर बदलण्यासाठी घेणार तेवढय़ात पोलिसांनी दुकानावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी लालाराम चौधरी (32) याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर लालारामच्या चौकशीत प्रवीण संघवी (44), सूरज खारवार (21), नौशाद अस्लम शेख (25), इम्तियाज अन्सारी (31) आणि सरफराज सय्यद (24) या पाच जणांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली.

सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

ग्लोबल कंपाऊंडच्या दुसर्‍या मजल्यावरील 23 क्रमांकाच्या दुकानात पोलिसांनी छापा टाकला तेव्हा वेगवेगळ्या कंपनीचे सॉफ्टवेअर, आठ डोंगल, एक लॅपटॉप, तीन सीपीयू आणि 1 हजार 14 मोबाईल फोन असा 6 लाख 4 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी आयएमईआय नंबर बदलण्यासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर कुठून आणले तसेच त्यांच्याकडे सापडलेले मोबाईल चोरीचे आहेत का याचा तपास करणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या