शहरातील सिव्हिल हॉस्पिटलजवळील सावंत प्लॉटमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील अंजली नितीन खांडेकर (वय 6, रा. पहिली गल्ली, सावंत प्लॉट) या बालिकेचा खेळता खेळता कापडी बेल्टने गळफास बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी घडली. घटनेनंतर चिमुरडीचा मृत्यू संशयास्पद नाही ना? या शक्यतेने पोलिसांनी दीड तास चौकशी केली. अखेर वैद्यकीय तपासणीत गळफास बसून तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमागे सावंत प्लॉटमध्ये खांडेकर कुटुंब राहते. नितीन खांडेकर हे मार्केटयार्डमध्ये हमाली करतात. त्यांना मोठी मुलगी अंजली आणि दोन वर्षांचा मुलगा आहे. अंजली ही वसंत प्राथमिक शाळेत पहिलीत शिकते. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी आली. घरात चिमुकली अंजली, आई, छोटा भाऊ आणि आजी असे चौघे होते. दुपारी चारच्या सुमारास अंजलीला टीव्हीवर कार्टून लावून दिल्यानंतर आई धाकट्या मुलाकडे लक्ष देत होती.
थोड्या वेळाने आई बाहेर आली तेव्हा अंजली खुंटीला कापडी बेल्टने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. आईने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलाविले. अंजलीला खुंटीवरून खाली काढले. त्यानंतर तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनीही सिव्हिलमध्ये येऊन माहिती घेतली. अंजलीच्या मृत्यूप्रकरणी दीड तास चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, चौकशीत आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. मृत अंजलीचे शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत गळफास लागल्याने अंजलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.