सुंजवामधील हल्ल्यातील शहिदांची संख्या वाढली, सहावा मृतदेह हाती

28
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । जम्मू, श्रीनगर

श्रीनगरमध्ये सीआरपीएफ मुख्यालयाजवळ सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास दहशतवादी आणि सीआरपीएफचे जवान यांच्यात चकमक उडाली. काल रात्री गोळीबार थांबला होता. मात्र आज दिवस उजाडताच पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला. अद्यापही चकमक सुरू असून ३ ते ४ दहशतवादी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सुंजवा येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यातील सहाव्या शहीद जवानाचा मृतदेह आज सकाळी हाती लागला आहे.

करण नगर येथे सीआरपीएफच्या मुख्यालयात घुसण्याच्या इराद्यानं ३ ते ४ दहशतवाद्यांनी सोमवारी पहाटे हल्ला केला. यावेळी एक जवान शहीद तर एक जखमी झाला. सीआरपीएफच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत त्यांचे मनसुबे उधळून लावले. मात्र ते दहशतवादी जवळच असलेल्या एका इमारतीत शिरले. जवानांनी या इमारतीला घेरलं असून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सामान्य नागरिकांची कोणतीही हानी होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली आहे, अशी माहिती सीआरपीएफचे आयजी (ऑपरेशन) जुल्फिकार हसन यांनी दिली.

दरम्यान, शनिवारी दहशतवाद्यांनी सुंजवा लष्करी तळावर हल्ला केला होता. ज्यामध्ये ५ जवान शहीद झाले होते. तिथल्या शोध मोहिमेत आणि एका शहीद जवानाचा मृतदेह मंगळवारी पहाटे लष्कराच्या हाती लागल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे सुंजवा येथील शहिदांची संख्या ६ वर पोहोचली आहे. या तळावर लष्करी अधिकारी आणि जवानांची निवासस्थानं आहेत. जवानांच्या कुटुंबीयांना ओलीस ठेवण्याचा आणि मोठी जीवितहानी करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र बहादूर जवानांनी ३० तास ऑपरेशन करून चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या