६० वर्षीय वृद्धाचा स्वतःच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार

सामना ऑनलाईन । मुंबई

एका ६० वर्षीय वृद्धाने त्याच्याच १४ वर्षीय नातीवर बलात्कार करून आजोबा आणि नातीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वृद्घ हा पीडितेच्या आईचा बाप आहे. ते तिघेही एकाच घरात राहतात. ही घटना गेल्या आठवड्यात बुधवारी १२ एप्रिल रोजी घडली. बुधवारी सकाळी नऊ वाजता पीडितेची आई कामावर निघून गेल्यानंतर या वृद्धाने आपल्या नातीचे हात पाय बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेची कुठेही वाच्यता न करण्याबद्दलही बजावलं.

दोन दिवसांनी पीडित मुलीने आपल्या आईला घडलेली घटना सांगून टाकली. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केल्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तिच्या आजोबाला अटक केली.