अदानी यांना आणखी एक धक्का; लंडनमधील कंपनीची चौकशी ब्रिटन सरकारने दिले आदेश

अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्च फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या जगभरातील कंपन्यांकडे आता संशयाने पाहिले जात असून लंडनमधील अदानी समूहाशी संबंधित ईलारा कॅपिटल या कंपनीच्या चौकशीचे आदेश आज ब्रिटिश सरकारने दिले. ब्रिटनची फायनान्शियल कन्डक्ट ऑथॉरिटी (एफसीए) ईलाराची चौकशी करणार आहे. कथित आर्थिक घोटाळय़ाशी या कंपनीचा काही संबंध आहे का, याची शहानिशा एफसीए करणार आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांनी एफपीओ बाजारात आणताना शेअर्समध्ये मोठय़ा प्रमाणात हेराफेरी केली असून अदानींच्या काही शेअर्सची किंमत ही बाजारातील तिच्या मूल्याशी जुळणारी नाही, असा गौप्यस्फोट अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने केला होता. हिंडेनबर्गने 24 जानेवारीला 106 पानांचा अहवाल जारी केल्यानंतर अदानी यांनी 25 जानेवारीला एफपीओ बाजारात आला होता, मात्र एफपीओसकट अदानी समूहातील 9 कंपन्यांचे शेअर्स जोरदार कोसळले.

माजी पंतप्रधानांचे भाऊ मानद संचालक 

हिंदुस्थानबाहेरून हवालामार्फत पैसे पुन्हा देशातील कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा आरोपही अदानी समूहावर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ईलाराचा कथित आर्थिक घोटाळय़ाशी काही संबंध आहे का, याची शहानिशा केली जाणार आहे. ईलारामध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे सख्खे भाऊ जो जॉन्सन बोर्डावर मानद संचालक म्हणून काम करत होते, मात्र अदानी समूहाचे शेअर्स कोसळू लागल्यानंतर 1 फेब्रुवारीला जो यांनी तडकाफडकी राजीनामा देत यातून मानद संचालक पदावरून अंग काढून घेतले.

ईलारा कॅपिटल काय करते 

राज भट्ट यांनी 2002 मध्ये हिंदुस्थानातील कॉर्पोरेट्स कंपन्यांसाठी परदेशातून आर्थिक गुंतवणूक मिळावी यासाठी ईलारा कॅपिटलची स्थापना केली. ईलारा ब्रिटनसह सिंगापूर, मॉरिशस, न्यूयॉर्क, अहमदाबाद आणि मुंबईतूनही गुंतवणूक गोळा करते. 

मोदींनी नियमांत बदल केल्यामुळेच 5 विमानतळांचा कब्जा अदानींकडे 

नियमांमध्ये बदल केल्यामुळेच देशातील अहमदाबाद, गुवाहाटी, जयपूर, तिरुअनंतपूरम आणि मंगळुरू या आंतरराष्ट्रीय विमानतळांचा विकास करणे आणि ऑपरेटिंगचे कंत्राट 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेने उद्योगपती गौतम अदानी यांनी मिळवले. केंद्रीय खात्यांनी तसेच निती आयोगानेही अशा प्रकारे कोणत्याही खासगी कंपनीला विमानतळांचे कंत्राट देणे हिताचे नसल्याचा सल्ला मोदी सरकारला दिला होता. मात्र, त्याकडे कानाडोळा करत 4 वर्षांपूर्वी मोदींनी हे कंत्राट अदानी समूहाला दिले, असा आरोप पत्रकार रवी नायर यांनी पुराव्यांसह केला आहे. मोदी यांनी अदानींसाठी अधिकारांचा गैरवापर करून नियमबाह्य कृती केल्याचा हा अत्यंत वास्तव पुरावा मी भाजपला देत आहे, असेही नायर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.