आजारी मुलीसाठी रात्रभर जागा राहिला, दुसऱ्या दिवशी पाकिस्तानला फोडून काढला

79

सामना ऑनलाईन, लंडन

पाकिस्तानविरूद्ध इंग्लंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने तुफान फटकेबाजी करत शतक झळकावलं. रॉयने ज्या मनस्थितीत हे शतक झळकावलं ते कळाल्यानंतर त्याच्यावर चहूबाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे. जेसनने रात्रभर जागून काढली होती. अवघ्या दोन महिन्यांच्या लेकीसाठी त्याने रात्रभर धावपळ केली आणि दुसऱ्या दिवशी मैदानात त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

जेसनच्या मुलीला गुरुवारी रात्री ताप आला होता. दीडच्या सुमारास त्याची मुलगी एव्हर्ली तापाने फणफणायला लागली होती. त्याने आणि त्याच्या बायकोने मुलीला रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं. रात्रभर तो मुलीसाठी जागा राहिला होता. सकाळी 8.30 च्या सुमारास तो पुन्हा घराकडे निघाला. घरी गेल्यानंतर त्याने एक-दोन तास आराम केला आणि नंतर तो थेट मैदानात सरावासाठी उतरला. सामना सुरू झाल्यानंतर जेव्हा जेसन रॉय मैदानात उतरला तेव्हा त्याची तळपणारी बॅट पाहून पाहून पाकिस्तानी गोलंदाज थिजले होते. रॉयने शतक झळकावून सामनावीराचा पुरस्कार पटकावला. यानंतर त्याने आपल्याला रात्रभर झोप मिळाली नसल्याची बाब सगळ्यांना सांगितली. ती ऐकल्यानंतर त्याच्या खेळीचं विशेष कौतुक सुरू झालं.

जेसन रॉयने या मालिकेमध्ये पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे 87 आणि 76  धावा केल्या होत्या. या दोन सामन्यात त्याला शतक झळकावता आलं नव्हतं, त्याची शतक झळकावण्याची इच्छा तिसऱ्या सामन्यात पूर्ण झाली. रात्रभर मुलीच्या तब्येतीची चिंता, अपुरी झोप अशा प्रतिकुल परिस्थितीतही झळकावलेल्या हे शतक आपल्यासाठी कायम खास असेल असं जेसन रॉयने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या