‘वंदे मातरम्’ इस्लामविरोधात, खासदार शफीकुर्र रहमान बर्क यांचा घोषणांना विरोध

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

17 व्या लोकसभेतील संसदेच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. सोमवारी पहिल्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. दुसऱ्या दिवशीही काही खासदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. यावेळी समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्र रहमान बर्क यांनी ‘वंदे मातरम्’ घोषणा देण्यास विरोध केला.

सोमवारी सपा खासदार शफीकुर्र रहमान बर्क यांनी संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी ‘वंदे मातरम्’ची घोषणा देण्यास विरोध केला. ‘वंदे मातरम्’ इस्लाम धर्माच्या प्रथा आणि परंपरा विरोधात असल्याचे शफीकुर्र रहमान बर्क म्हणाले. शफीकुर्र रहमान बर्क यांच्या अशा विरोधी वक्तव्यानंतर संसदेमध्ये उपस्थित खासदारांनी ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या.

शपथविधीवेळी गोंधळ सुरुच
त्याआधी सोमवारी भोपाळ येथील खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या शपथविधीवेळी गोंधळ उडाला होता. तसेच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या शपथविधीवेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.