बारावीच्या शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा नाहीच, पेपर तपासणी धीम्या गतीने

36
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना ऑनलाईन, मुंबई

सरकारदरबारी दखल घेतली जात नाही म्हणून बारावीच्या परीक्षांना लक्ष्य करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगाच निघालेला नाही. त्यामुळे दररोज एकच पेपर तपासण्यावर शिक्षक ठाम असून सध्यातरी पेपर तपासणी धीम्यागतीने सुरू आहे.

वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली सध्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी कामावर असहकार आंदोलन सुरू आहे. शिक्षकांच्या काही मागण्या या अर्थ विभागाशी निगडित असून अर्थमंत्र्यांशी चर्चा करून या मागण्यांवर अधिवेशनापूर्वी निर्णय घेण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झालीच नाही. तावडे यांच्यासोबत महासंघाच्या शिष्टमंडळाची पुन्हा एकदा बैठक झाली. या बैठकीत विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. मात्र तरीही मागण्या मान्य होण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत असहाकार सुरूच ठेवण्याचा महासंघाचा निर्णय आहे.

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चालढकल

शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आमच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर स्वतः शिक्षणमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मागण्यांच्या पूर्ततेसंबंधी आम्हाला लिहून देण्यासंबंधी सूचना केली होती, मात्र शिक्षणमंत्र्यांनी सांगूनही अधिकाऱ्यांकडून आम्हाला कोणतीही लेखी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही पुढील आंदोलनावर ठाम आहोत.
प्रा. अनिल देशमुख, सचिव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने १६ मार्चला आयोजित केलेल्या मरीन लाइन्स ते आझाद मैदान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता मोर्चाऐवजी आझाद मैदानात जेल भरो करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे.

या आंदोलनानंतरही शिक्षकांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास १७ मार्चपासून पेपर तपासणी पूर्णपणे बंद करून मॉडरेटर्सच्या बैठकांनाही न जाण्याचा निर्णय शिक्षक महासंघाने घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या