इमारतींपेक्षा झोपडपट्टीतील रहिवासी जास्त शिस्तप्रिय! महानगरपालिका आयुक्तांनी मांडले वास्तव

1646

मुंबईत सध्या झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या विभागांमधून कोरोना हद्दपार होत असून उंच इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, याला इमारतींमधील बेशिस्त रहिवासीच जबाबदार आहेत. इमारतींपेक्षा झोपडपट्टीतील रहिवासी जास्त शिस्तप्रिय आहेत, असे वास्तव मुंबई महानगपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मांडले.

मुंबईत कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर वरळी, धारावी, माटुंगा या सारख्या दाटीवाटीच्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठया संख्येने सापडू लागले. मात्र, घरोघरी जाऊन जनजागृती, तपासणी, फिव्हर कॅम्प, कोरोना सेंटर्स उभारणी, तात्काळ आयसोलेशन आणि कोरेंनटाईन तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे झोपडपट्टीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 80 दिवसांवर पोहोचला असून रुग्णवाढीचा दर हा 0.87 टक्क्यांवर पोहोचला आहे. आता  इमारतींमधील रहिवाशांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे इमारतींमधील कोरोना रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आणणे, ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.

 

80 टक्के रुग्ण उंच इमारतींमधील

मुंबईत सुरुवातीला झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला होता. मात्र, झोपडपट्टीमधील रहिवाशांनी आरोग्य कर्मचार्यांसाठी आपले दरवाजे उघडून स्वागत केले. त्यांनी नियमांचे पालन केले. त्यामुळे झोपडपट्टीतील कोरोनाचा प्रसार रोखता आला, असे आयुक्तांनी सांगितले. मुंबईमध्ये सध्या रोज 1100च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी 80 टक्के रुग्ण उंच इमारतीमधील आहेत. उंच इमारतीमधील रहिवासी बेशिस्तपणे वागत असल्याने इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांनी झोपडय़ांमध्ये राहणाऱया रहिवाशांकडून थोडे तरी शिकावे, असा सल्ला आयुक्तांनी दिला.

चाचण्यांची संख्या दिवसाला 14 हजारपर्यंत वाढवणार

मुंबईची लोकसंख्या दोन कोटींच्या जवळपास आहे. सध्या रोज 1100 च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. काही दिवसांपूर्वी हा आकडा 700 पर्यंत आला होता. मात्र, तरीही आम्ही रोज 3,600 ते 3,700 चाचण्या रोज करत आहोत. ऑगस्ट महिन्यात चाचण्यांची संख्या दिवसाला 12 हजार ते 14 हजारपर्यंत करण्याचा पालिकेचा विचार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या