स्मार्ट युगात…

 

– मेघा गवंडे-किटे

मुंबईच्या ट्रफिकमधून वाट काढून इप्सित स्थळी पोहोचणं महाअवघड… पण वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर मार्ग काढलाय…

मुंबईतील अरुंद रस्ते… त्यातच रस्त्याच्या किंवा गल्लीच्या दुतर्फा असणारे फेरीवाले आणि अतिक्रमणामुळे एखादी गाडी घुसवताना चालकाला मोठी कसरत करावी लागते. यात बराच वेळ निघून जातो. वाहतूककोंडीत फसलेली गाडी आपण सर्वांनीच पाहिली असेल. पण याच कोंडीत जेव्हा एखादी रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडी अडकते तेव्हा…! मनात विचार येतो रुग्णवाहिकेत असलेल्या रुग्णाला वेळीच रुग्णालय गाठता येईल ना किंवा ज्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे तेथे अग्निशमन दलाची गाडी लवकर पोहोचेल ना…? पण आता काळजी करण्याची गरज नाही कारण वेळ न दवडता नैसर्गिक आपत्ती किंवा एखाद्या दुर्घटनेची माहिती देण्याबरोबरच या आपत्तीवेळी मदत पुरविणाऱ्या सेवा तातडीने पुरविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र अॅपच्या सहाय्याने विकसित करण्यात आले आहे.
व्हिजेटीआयमध्ये द्वितीय वर्ष एमसीएला शिकणाऱ्या सहा विद्यार्थ्यांच्या ‘टीम टेक जंकीज’ने हे अॅप तयार केले असून नुकत्याच माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्य़ूटमध्ये पार पडलेल्या सलग ३६ तासांच्या राष्ट्रीय हॅकेशॉनमध्ये या अॅपला दुसऱ्या क्रमांचे पारितोषिक मिळाले. ७५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून या विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघालेली ही संकल्पना विकसित करण्याची जबाबदारी अणुऊर्जा आयोगाने उचलली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वतीने ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७’ चे आयोजन करण्यात आले होते.

असे करता येईल आपत्ती व्यवस्थापन
– टीम टेक जंकीजने जीपीएसच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन कसे करता येईल,याचे तंत्र विकसित केले आहे.
– यात कोणत्याही आपत्तीची माहिती मिळण्यासाठी वेबसाईट बेस कंट्रोल रूम तयार करून त्याची जबाबदारी एका प्रमुख व्यक्तीवर असेल.
– त्यानंतर चार वेगवेगळे अॅण्ड्राईड अॅप तयार केले असून पहिले अॅप सरकारी यंत्रणेसाठी, दुसरे वैद्यकीय, अग्निशमन यंत्रणेसाठी तसेच तिसरे अॅप रुग्णवाहिनीसाठी असून चौथे अॅप सामान्य नागरिकांसाठी आहे.
– पहिल्या अॅपच्या माध्यमातून सरकारी यंत्रणा दुर्घटनेची माहिती कंट्रोल रूमला देईल. या माहितीची खातरजमा केली जाईल.
– वैद्यकीय सेवेसाठी असलेले दुसरे अॅप ज्या भागात दुर्घटना घडली आहे त्या परिसरात किती रुग्णालये आहेत, याचा तपशील गोळा करून कंट्रोल रूमशी संपर्क साधेल.
– त्यानंतर तिसरे अॅप रुग्णवाहिनी चालकाकडे असेल. जीपीएसच्या सहाय्याने दुर्घटनाग्रस्त भागाचा मार्ग, तेथील रुग्णालयापर्यंतच रस्ता चालकाला दाखविला जाईल.
– चौथ्या अॅपद्वारे सामान्य नागरिक त्या दुर्घटनेची माहिती कंट्रोल रूमला कळवू शकेल.

इंटरनेट नसेल तेव्हाही उपयोग
इंटरनेट सेवा नसेल तेव्हाही या ऍपचा उपयोग करता येईल. याशिवाय कंट्रोल रूमकडून एखाद्या दुर्घटनेची खातरजमा झाल्यास ऍपवर अलर्ट अलार्म वाजेल. या ऍपचे जास्तीत जास्त काम हे समन्वयावर अवलंबून असून या ऍपमध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सुधारून हे ऍप उपयोगात आणण्याचा विचार आहे.
– सौरभ पाटील, प्रमुख, टीम टेक जंकीज