ऑफिससाठी स्मार्ट पेहेराव

ऑफिसला जाताना काय घालायचं… प्रत्येक ऑफिसची स्वतःची अशी संस्कृती असते त्याप्रमाणेच पेहराव करावा लागतो.

दररोजच्या धावपळीच्या जीवनात कॉलेज, अभ्यास, घरकाम या सगळ्या जबाबदाऱया सांभाळून महिला नोकरी करतात. यामध्ये महिलांसाठी सर्वात मोठा प्रश्न असतो तो स्मार्ट लुकसाठी ऑफिसला रोज काय पेहराव करायचा? समोरच्या व्यक्तीवर इम्पॅक्ट पडायला हवा असेच ड्रेसिंग हवे. ऑफिसला सूट होईल असाच आपला लुक असायला हवा. ऑफिसमध्ये आकर्षक पोशाख आणि ऍक्सेसरीजद्वारे तुम्ही तुमचा लुक बदलू शकता.

प्रत्येक ऑफिसमध्ये एक कल्चर असत. काही लिखित-अलिखित नियम असतात. त्यामुळे कामातलं गांभीर्य आणि कपडय़ांचे नियमही ठरतात. ऑफिस ही एक अशी जागा आहे, ज्या ठिकाणी तुमच्या कामाबरोबरच पर्सनॅलिटी, स्टाईललादेखील महत्व दिले जाते. कारण तुमच्या ड्रेसच्या निवडीचा प्रभाव तुमच्या नोकरीवर पडतो. यामध्ये विशेषतः तरुणी किंवा महिलांना कपडय़ांबरोबरच ऍक्सेसरीजकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक ऑफिस वुमन ने क्लासी व स्मार्ट लुकसाठी पारंपरिक व पाश्चिमात्य कपडय़ांच्या फ्यूझनचा वापर करू शकता.

ऑफिसमध्ये ब्लू, ब्राऊन, व्हाईट आणि ब्लॅक या रंगांचा वापर करा. हे रंग ऑफिसमध्ये तुम्हाला अधिकच स्मार्ट बनवतील. फॉर्मल वेअर म्हणून निळी पँट-व्हाईट शर्ट, ब्लॅक आणि पीच, पावडर ब्लू, फिकट निळा, न्यूट्रल पिंक असे रंग वापरता येतील. ट्राऊझर,फॉर्मल प्लेन, प्रिंटेड, चेक्स शर्टस्, स्ट्रेट लाइन स्कर्टस्, सूटस यांचादेखील वापर करू शकता. हिंदुस्थानी पेहरावाला पसंती देणार असाल तर फिकट-गडद रंगांचे प्लेन कुर्ते,चुडीदार एम्ब्रॉयडरी केलेले कुर्ते शोभून दिसतील. ग्लॅमरल लुकसाठी पॅरलल पॅण्टस्सोबत कुर्ती वापरू शकता. डिकन्स्ट्रक्टेड ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर असा लुक मिळू शकतो. तसेच ऑफ शोल्डर, वन आणि पफ शोल्डर ड्रेसदेखील वापरू शकता. स्पोर्टी लुकसाठी खाकी शर्ट, वेल्वेट पॅण्टस, स्कर्टस्, जेगिंग्सचा वापर करू शकता.

सध्याच्या समर सीझनमध्ये ऑफिसमध्ये जीन्स, कुर्ता, लेगिंजसारखा ड्रेसकोड नकोसा झाला असेल तर पलाझो पॅण्टस् वापरू शकता. यामध्ये फ्लोरल, ऑनिमल्स, प्लेन अशा प्रिंटमध्ये विविध फॅब्रिक्समध्ये मिळतात. ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी ड्रेसचे फॅब्रिक, परफेक्ट फिटिंग, लेअरअप, शोल्डर्स आणि वेस्ट लाइन, प्रिंटस् आणि ऍक्सेसरीज यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच आजच्या घडीला एक कॉमन गोष्ट ठरत आहे ती म्हणजे फॅशनेबल स्कार्फ आणि स्टोल्स्च्या विविध नॉटस् . फॉर्मल ड्रेसेसवर स्कार्फ बांधायच्या वेगवेगळे नॉटस्चे प्रकार आहेत. यामध्ये युरोपियन नॉट, एक्सॉट स्टाईल, स्टोल नेकलेस, हेडबँड नॉट, सिंपल नॉट स्टायलिश दिसतात. सणाच्या दिवसांत फॉर्मल ड्रेसिंगवर ट्रेंडी स्टोल आवर्जून वापरा. त्यामध्ये क्रिस्टल, गोल्ड प्लेटेट हे पॅटर्न चांगले दिसतील. याबरोबरच फ्लोरल पॅण्टस,पटियाला सलवार,जीन्स-कुर्ता यांचा वापर करू शकता.

स्मार्ट ड्रेसिंगसोबत हटके ऍक्सेसरीजही महत्त्वाची ठरते.यामुळे वेगळा असा लुक मिळतो. यामध्ये छोटय़ा-मोठय़ा आकाराची रिस्ट वॉच, क्लचेस, फूटवेअर्स, स्टायलिश ब्लेझर, बेल्टस्, आकर्षक बॅग्स, स्टायलिश मोबाईल पाऊच यांचा समावेश आहे. सणासुदीच्या काळात ऑफिसला काय कपडे घालायचे हा महत्त्वाचा प्रश्न सर्वांसमोर असतो. तुमची कंपनी कशी आहे आणि तिथलं वातावरण यावरही ते अवलंबून असतं. तरीही ऑफिसच्या दृष्टिकोनातून तुम्ही सणाला शोभेल असं ड्रेसिंग करणं आवश्यक आहे. इंडो-वेस्टर्न केट्स,कुर्तीज,साडी,लाँग स्कर्टस्,दुपट्टा वापरू शकता.