स्मार्ट व्हा!

आजच्या आधुनिक युगाला साजेसे स्मार्ट घडय़ाळ मनगटावर असले की मोबाईल फक्त खिशात किंवा पर्समध्ये असला की पुरते

आजची तरुणाई… सुपरफास्ट… विलक्षण वेग… थांबायला वेळच नाहीय कुणाला… आपली गॅझेट्सही त्यानुसार बदलताहेत. तंत्रज्ञानाने अधिकाधिक समृद्ध होत आहेत. बाईक चालवताना, प्रचंड कामात असताना, मोबाईल आपण २४ तास हातात ठेवू शकत नाही. पण म्हणून मोबाईल कॉल्स, मेसेजेस, व्हॉट्सअप, फेसबुक यांचा रतीब थांबू शकत नाही. तो अव्याहत सुरूच असतो. या सगळ्या फोनच्या घडामोडी आपल्या हातावर दिसतात ऍण्ड्रॉईड वॉचमुळे…

अलीकडे अशी घडय़ाळे वापरणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या घडय़ाळात नेहमीप्रमाणे वेळ पाहता येतेच, पण त्याबरोबरच मोबाईलमध्ये कुणाचा कॉल आलाय त्याचे नाव, एसएसएस किंवा आपल्या पसंतीच्या मोबाईल ऍब्सच्या नोटिफिकेशन्सही तत्परतेने येत असतात. फक्त मनगटावरील घडय़ाळाकडे नजर टाकली तरी काम होईल. नुसते मेसेजच नव्हे, तर या स्मार्ट घडय़ाळावर स्मायली टाकून उत्तरेही देता येतात आणि काही विशिष्ट घडाळ्यांमध्ये तर कॉल्सवर थेट बोलताही येते. टाईपही करता येते. समोरच्या व्यक्तीला लगेच उत्तर मिळाल्याचं समाधान मिळतं, पण आपण मुळात मोबाईलचा वापर केलेलाच नसतो.

पहिले डिजिटल घडय़ाळ १९७२ साली पल्सर या नावाने हॅमिल्टन वॉच कंपनीने बनवले. पल्सर लवकरच या प्रकारच्या घडय़ाळांमध्ये ब्रॅण्डनेम झाले. नंतर १९७८मध्ये सिको कंपनीने यात मुसंडी मारली. मात्र पल्सर घडय़ाळांनी १९८२मध्ये २४ आकडय़ांचे घडय़ाळ आणले. या स्मार्ट वॉचमध्ये प्रथमच प्रोग्रॅमेबल मेमरी बसवण्यात आली होती. त्यामुळे त्याला मेमरी बँक म्हटलं जाऊ लागलं. १९९९ साली सॅमसंग कंपनीने जगातील पहिला वॉचफोन सादर केला. पुढे आयबीएम कंपनीने जून २०००मध्ये लायनक्सद्वारे चालणारे मनगटी घडय़ाळ आणले. त्याला ८ एमबी मेमरी होती. आता गेल्याच वर्षी नाबू वॉच कंपनीने डय़ुअल स्क्रीन स्मार्ट वॉच बाजारात आणले, तर ३१ ऑगस्ट २०१६ या दिवशी सॅमसंगनेच ‘गियर एस-3’ हे स्मार्ट वॉच दाखल केले.

मोबाईलसारख्याच सुविधा

काही वर्षांपूर्वी कानाला यूएसबी हॅण्डसेट किंवा ब्लू टूथद्वारे मोबाईलला हातही न लावता कॉल स्वीकारायची सोय झालीच होती ना… पण आता कानाला लावण्याची ब्लू टूथ उपकरणे दिसेनाशी होऊ शकतात. कारण तशीच पद्धत पण घडय़ाळाच्या माध्यमातून आता लोकांना मिळाली आहे. या घडय़ाळांना स्मार्ट वॉच तर म्हणतातच, पण वॉचफोन असंही त्यांना म्हटलं जातं. मोबाईलप्रमाणेच या स्मार्ट घडय़ाळांमध्ये एलसीडी किंवा ओएलईडी असण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक व्हिज्युअल डिस्प्ले असतो. अनेक घडय़ाळांमध्ये तर रिचार्जेबल बॅटरीचीही सोय असते, तर काही मोजक्या स्मार्ट घडय़ाळांमध्ये टच स्क्रीनही मिळू शकते. पण प्रत्येक खास फंक्शन्सनुसार या घडय़ाळांची किंमत वाढत जाते. ही घडय़ाळे कोणत्याही प्रकारच्या बाहेरच्या उपकरणांना ब्लूटूथच्या माध्यमाने जोडताही येऊ शकतात. त्यामुळे काही प्रकारचे सेन्सर्स, वायरलेस हेडसेट्स किंवा हेड्सअप डिस्प्ले या उपकरणांना ही घडय़ाळे कम्पॅटिबल असू शकतात.

दिल्ली मेट्रोनेही घेतला फायदा

काही महिन्यांपूर्वी दिल्ली मेट्रोने योजनाच सुरू केली की, स्मार्ट घडय़ाळ घालून मेट्रोचा प्रवास करा. त्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन स्मार्ट वॉच रिचार्ज सिम घेऊन आली आहे. या सिममुळे दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना तिकीट आहे की नाही हेही कुणी विचारणार नाही. तिकीट बुकिंग स्मार्टवॉचमुळे मेट्रो तिकीट काऊंटरवर आपोआप तिकीट असल्याची नोंद होणार आहे. दिल्ली मेट्रोच्या तिकिटासाठी किंवा महिन्याच्या पासासाठी लॉक्स कंपनीच्यास्मार्ट वॉच2पेवरून टॉपअप घेता येतो. तसाही तेथील मेट्रो प्रवासासाठी स्मार्ट कार्ड आणि टोकनद्वारे तिकिटाची नोंद करता येते. पण स्मार्ट कार्ड ही पद्धत दिल्ली मेट्रोला बंद करायची आहे. एकदा स्मार्ट वॉच योजना यशस्वी झाली की त्यानंतर स्मार्टकार्ड पद्धत बंद करता येणार आहे.

स्मार्ट वॉच म्हणजे काय?

स्मार्ट वॉच म्हणजे मनगटावरील एक घडय़ाळच… पण त्यात वेळ बघण्याहून आणखीही काही सुविधा मिळू शकतात. जसे बेरीज-वजाबाकी, अनुवाद, गेम्स, कॉल्स, संदेशांची देवाणघेवाण… म्हणजेच जी कामे मोबाईलद्वारे आपण करतो तीच घडय़ाळाने करायची. कारण अशा घडय़ाळांमध्ये मोबाईलचीच ऑपरेटिंग सिस्टीम काम करते. म्हणूनच तर त्यात पोर्टेबल मीडिया प्लेअर, एफएम रेडियो या सोयीही मिळू शकतात. घडय़ाळासारखा चेहरा असला तरी हा एक प्रकारचा मोबाईलच आहे असे म्हटले तरी चालेल. कारण यात डिजिटल मॅप्स पाहता येतात, शेडय़ुलर्स आणि पर्सनल ऑर्गनायझर, कॅल्क्युलेटर ही सॉफ्टवेअर्सही टाकता येतात. काही घडय़ाळे तर जीपीएस, ब्लू टूथ किंवा वायफाय अशा वायरलेस सपोर्टनेही चालतात.