धुम्रपानामुळे शरीराच्या या अवयवांना असतो धोका

918

सामना ऑनलाईन । मुंबई

सिगरेट, विडी, तंबाखू आणि इतर तत्सम उत्पादनांच्या दुष्परिणामांची माहिती तर सगळ्यांनाच असते. तरीही अनेकजण अशा पदार्थांचं सेवन करतात. काहीजण शौक म्हणून तर काही तणाव दूर व्हावा म्हणून. सिगरेट किंवा तत्सम पदार्थांमुळे तणाव दूर होतो किंवा मन हलकं होतं, अशा भ्रामक समजुतींमुळे लोक व्यसनी होतात. पण, या व्यसनाची मोठी किंमत शरीराला चुकवावी लागते. तोंड आणि फुप्फुसाव्यतिरिक्त अनेक अवयवांना धुम्रपानाचा धोका असतो.

त्वचा

सतत धुम्रपानाचा परिणाम हा काही काळाने त्वचेवर दिसू लागतो. यामुळे त्वचेवर सुरकुत्या येतात. तसंच व्यक्ती अधिक वयस्कर दिसते. शिवाय यामुळे बरेच त्वचेचे रोग उद्भवू शकतात. त्वचेच्या कर्करोगासारखा गंभीर आजारही यामुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डोळे

धुम्रपान केल्याने दृष्टीवर परिणाम होतो. यामुळे धूसर दिसण्याचा धोका असतो. तसंच धुम्रपानाने मोतिबिंदू होण्याच्या शक्यतेत तिपटीने वाढ होते.

लैंगिक अवयव

धुम्रपानाचा लैंगिक अवयवांवर देखील विपरीत परिणाम होतो. अतिप्रमाणातील धुम्रपानामुळे पुरुषांना टेस्टिक्युलर कॅन्सर(यामध्ये पुरूषांच्या हार्मोन्स तयार करण्याच्या प्रकियेवर परिणाम होतो.)फक्त पुरुषांनाच नाही तर धुम्रपानामुळे महिलांना देखील सर्व्हायकल कॅन्सरचा धोका असतो.

हिरड्या

हिरड्या नाजूक होणं, हिरड्यांमधून रक्त येणं, खाताना त्रास होणं, श्वासाला दुर्गंधी येणं या अशा प्रकारच्या समस्या धुम्रपानामुळे उद्भवतात. जर तुम्ही अतिप्रमाणात धुम्रपान करत असाल तर या तक्रारी उद्भवण्याचा दोका दुपटीने वाढतो.

मेंदू

जर तुम्ही सिगरेट ओढत तर स्ट्रोकचा धोका तिप्पटीने वाढतो. यासोबतचं मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी होण्याची समस्याही निर्माण होते. यामुळे चालताना तोल जाणं, धूसर दिसणं इत्यादी समस्या उद्भवू शकतात. स्ट्रोकचा धोका वाढल्यामुळे हा धोका जीवावर देखील बेतू शकतो.

फुफ्फुस

धुम्रपानामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका ९० टक्क्यांनी वाढतो. सिगारेट ओढल्याने यकृत, किडनी, स्वादुपिंड, पोट यांचा देखील कर्करोग होऊ शकतो. तसंच श्वसनासंबंधीचे आजार देखील यामुळे बळावतात.

हृदय

हृदयासंबंधीचे आजार होण्यासाठी प्रमुख कारण म्हणजे धुम्रपान. धुम्रपानामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये गाठी निर्माण होऊन रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या