स्मृती संगीत

237

<< संगीत सान्निध्य >>   << सारंगी आंबेकर >>

कलाकारांनाही सामान्य माणसाप्रमाणे लौकिक किंवा सृजनप्रक्रियेसंदर्भात असंख्य विवंचना भेडसावत असतात. मात्र मनस्वी कलाकारांचे पीळ उलगडायला समोरची व्यक्तीही कलोपासक, आस्वादक म्हणून श्रेष्ठ दर्जाची लागतेच, पण माणूस म्हणूनही अस्सल लागते. असे हे कलाकारांचे ‘हे हृदयीचे ते हृदयी’ विश्रब्ध शारदेत वाचताना नारायणरावांनी अर्थात बालगंधर्वांनी ज्या सीताकांत लाडांना ‘‘मी आजूनी व्हिस्परमधे बोलतो. घशातून आवाज सूरसुद्धा निघत नाही. हा माझ्या दुर्दैवाचा खेळ आहे.’’ किंवा ‘आता मी म्हाताराच दिसतो, परंतु अजून नाटकाला लोक येतात’’ अशी व्यथा उघड केली त्या बालगंधर्व व सीताकांत लाड यांच्या ममत्वाविषयी व पर्यायाने सीताकांत लाड या वल्लीविषयी कुतूहल जागे झाले. विश्रब्ध शारदेच्या याच पत्रसंग्रहात आणखी एक हृद्य पत्र म्हणजे बाई सुंदराबाई यांचे ज्यांनी असामान्य गुणांच्या बळावर आपल्या गायनाने भास्करबुवा बखले, बालगंधर्व, मास्तर कृष्णराव यांचा लोभ संपादन केला. त्या आपल्या ‘अंतरीचे धागे’ प्रकट करताना याच सीताकांत लाडांना म्हणतात, ‘‘ऑल इंडियात मी २५ वर्षे नोकरी करीते, पण मला एकही प्राणी आढळला नाही की एवढे अगत्याने घरच्यासारखे कोणी बोटभर चिठ्ठी पाठवली असेल. परवा दादा गंधर्व रेडियुत भेटले. मला फारच आनंद झाला जसा माझा पाठसखा भाऊच भेटला.’’

असे हे सीताकांत लाड पुणे आकाशवाणीवरून १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ प्रसारित झालेल्या बाबूजी व गदिमांच्या अजरामर ‘गीतरामायण’चे कार्यकारी निर्माते म्हणून महाराष्ट्राला अधिक परिचित आहेत.

संगीतात ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, किराणा इत्यादी घराणी आपण जाणतोच, पण यात संगीत जोपासनेला ज्या घराण्याने सर्वाधिक हातभार लावला ते म्हणजे ‘गुणग्राहक घराणे’, ज्याचा वारसा सांगणारे सीताकांत लाड हे बहुश्रुत रसिकाग्रणी व्यक्तिमत्त्व होय. घरामध्ये लहान वयापासून अनुभवलेला कलाकारांचा राबता, अनौपचारिक मैफलीतले अस्सल सूर, कलाभान जागृत होण्यासाठी ऐकलेल्या चर्चा, कलाकारांच्या स्वभावातील कंगोरे ही पुंजी मिळालेल्या लाडांनी त्यात आपल्या दिलदार वृत्तीने व आकलनाने घातलेली भर याचे ओघवत्या रसवंतीत केलेले वर्णन म्हणजे ‘स्मृति-संगीत’ हे होय. २००१ साली कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे आलेल्या या पुस्तकात साधारणपणे १९३० पासूनचा संगीत – साहित्यातील सुवर्णकाळ सीताकांत लाड तारतम्य, आत्मीयता व रंजकपणे मांडतात.

पुस्तकातील ‘मुक्काम भटवाडी’ या पहिल्याच प्रकरणात लाड गिरगावातील भटवाडी म्हणजे ‘विद्या – वाङ्मय – कला – संस्कृती, इथे काही न उणे’ अशा दिमाखात गजबजणारे सांस्कृतिक केंद्र म्हणून ज्याचा उल्लेख करतात ते किती सार्थ होते याचा प्रत्यय २५ पानांतच येतो. सीताकांत लाडांचे वडील चित्रकार गणपतराव लाड त्यांच्या गोतावळ्यात स्नेही वामन दुभाषी स्तंभलेखक वसंत नारायण नाईक, दुभाषींचा उमदा दिलदार स्वभावाचा नातू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, आद्य श्रीकृष्ण चरित्रकार चिंतामण विनायक वैद्य, लागूनच्या ब्लॉकमध्ये र. धों. कर्वे,  ज्ञानयोगी न. र. फाटक, वकील प्रल्हादाचार्य गजेंद्र गडकर असे भटवाडीकर, शिवाय नाक्यावरच्या दोन देवळांमुळे अविरत चाललेले उद्बोधन व कीर्तन यांचे वर्णन माझ्यासारखीला हेवा करावेसे वाटते. घरासमोर संगीताचे तीर्थस्थान मानली जाणारी लक्ष्मीबाग व त्यानिमित्ताने संगीतसम्राट अल्लादियाँसाहेब, गायनाचार्य वझेबुवा, मेनकाबाई शिरोडकर यांच्या बैठकांच्या मेजवान्या, राजा राममोहन रॉय शाळेतील कलाप्रेमी वातावरण, मॅजेस्टिकचे मूकपट ते पेंटरांचे बोलपट, बालगंधर्व व नाट्य संगीताचा उत्कर्ष काळ या सगळ्यांचे जरतारी संस्कार जपत बारीकसारीक व्यक्तीविशेषांनी वाचकांना नजरबंद करण्याचे कसब पहिल्याच प्रकरणाने खासच गाठले आहे.

‘न मिळे अशी मौज पुन्हा’ या दुसऱ्या प्रकरणात स्मृतीतील संगीत वेगवान होते. अनंत काणेकर, म. गो. रांगणेकर व चिटणीस त्रयीचे साहित्यिक सदर, ‘नाटय़मन्वंतर’ची जडणघडण, स्वातंत्र्य संग्रामाच्या नौबती यांचे वर्णन करताना लाड म्हणतात, काळ विविधांगी संक्रमणावस्थेचाच होता. लोकाभीरूची जीवनाच्या वास्तवतेतील कलेच्या रंजकशक्तीची वाट पाहत होती. ‘धर्मात्मा’ सिनेमानंतर बालगंधर्वांच्या माध्यमप्रणीत इतराजीमुळे तुकारामाची तंबुरी विष्णुपंत पागनीसांच्या हाती जाणे, एल्फिन्स्टन महाविद्यालयातील प्रवेश, त्यातील वाङ्मय मंडळाच्या स्नेहसंमेलनातील ना. सी. फडक्यांचे ‘ललित वाङ्मयाचे ध्येय’ हे अध्यक्षीय भाषण, मंजीखाँ साहेबांच्या गायकीचा व मैफलीचा वृत्तांत, मौज-सत्यकथेच्या दालनातील भावे, गाडगीळ, गोखले, माडगूळकर, के.ज. पुरोहित, मोकाशी यांची हजेरी. त्यांच्याच जोडीला मित्रवर्य मनोहर मणेरीकरच्या सहवासाने इंग्रजी पुस्तके व बोलपटांची लागलेली गोडी हे सर्व वाचताना आपली स्थिती त्यांनीच वर्णन केल्याप्रमाणे ‘पुष्पाविण येई वास वाऱ्याविण चाले श्वास, सुकलेली विश्वे भिजली’ अशी होते.                                             (क्रमशः)

आपली प्रतिक्रिया द्या