सरकारने वाळूधोरण ठरवूनही नगरमध्ये तस्करी सुरूच; दोन महिन्यांत 61 तस्करांवर कारवाई

राज्य सरकारने वाळूतस्करी रोखण्यासाठी नागरिकांना स्वस्त दरात वाळू देण्याचा निर्णय घेतला असून, वाळू डेपो तयार करण्यात आले आहेत. सरकारमार्फतच वाळूविक्री करण्यात येत आहे. मात्र, नगर जिह्यात अद्यापि वाळूतस्करी सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिह्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांमध्ये पोलिसांनी अवैध वाळूउपसा करणाऱया 61 वाळूतस्करांविरुद्ध धडक कारवाई करून दोन कोटी 81 लाख 53 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिह्यातील अवैध वाळूउपसा, वाहतूक व चोरीच्या गुह्यांचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱयांना अवैध वाळूउपसा करणाऱयांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांनी एप्रिल व मे महिन्यांमध्ये नगर जिह्यात अवैध वाळूउपसा करणाऱया तस्करांविरुद्ध कारवाई करून दोन कोटी 81 लाख 53 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यापुढेही अशाप्रकारे वाळूउपसा करणाऱया तस्करांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले आहे.