लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या २ कोटींच्या सापाची सीमेवर तस्करी

68

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या बिहार-नेपाळ सीमेवर एका इसमाला दुर्मीळ सापाची तस्करी करताना सशस्त्र सीमा दलाने अटक केली. हा साप दुर्मीळ मांडुळ प्रजातीचा असून ‘दुतोंड्या’ या नावाने प्रसिद्ध आहे. या सापाचा वापर लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये केला जातो. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने हा साप संरक्षित प्रजातीमध्ये घोषित केला आहे.

हिंदुस्थानी बाजारभावाप्रमाणे या सापाची किंमत अंदाजे १० लाख रुपये इतकी असून आंतरराष्ट्रीय बाजारात २ कोटी रुपयांना हा साप विकला जातो. हिंदुस्थान-नेपाळ सीमेवर अशा सापांच्या तस्करीची माहिती सशस्त्र सीमा दलाला मिळाली होती. त्यानुसार केलेल्या झडतीत एका बंद पेटीतून साप घेऊन जात असताना आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीचं नाव मोहम्मद शहाबुद्दीन असून तो बिहारच्या चंपारण्य भागातला रहिवासी आहे.

मांडुळ प्रजातीच्या दुतोंड्या या सापाची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. चीन, इंडोनेशिया आणि अरब देशांमध्ये या सापाला मोठी मागणी असल्याने सापाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. त्यामुळे सरकारतर्फे हा साप दुर्मीळ प्रजातीचा साप म्हणून संरक्षित केला गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या