कश्मीर खोऱ्यात तुफान पाऊस, जनजीवन ठप्प

34

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मीर खोऱ्याला तुफान पावसाने झोडपून काढल्याने अनेक ठिकाणी महापुराचा धोका निर्माण झाला. त्यातच रेकॉर्डब्रेक बर्फवृष्टी झाल्याने खोऱयातील जनजीवन ठप्प झाले आहे. महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या कश्मिरी जनतेला वाचवण्यासाठी लष्कर देवदूत म्हणून मदतीला धावले आहे. दरम्यान, महापुराच्या धोक्यामुळे कश्मीरातील शाळा-महाविद्यालयांना चार दिवस सुट्टी देण्यात आली आहे.
कश्मीरात तीन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. तुफान पाऊस आणि त्यातच होणारी रेकॉर्डब्रेक बर्फवृष्टी यामुळे खोऱ्यातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. झेलम तसेच तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण खोऱ्यात हायऍलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने सोमवारपर्यंत शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून सरकारी कर्मचाऱ्यानाही सुट्टी देण्यात आली आहे. फक्त आपत्कालीन विभागाचे काम युद्धस्तरावर चालू ठेवण्यात आले आहे.

झेलम नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. उत्तरी कश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्हय़ात फिरोजपूर येथील नाला दुथडी भरून वाहत असल्याने अनेक गावांत पाणी घुसले. या भागात तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून पुराच्या तडाख्यात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.

लष्करी छावणीवर हिमकडे कोसळले
जम्मू-कश्मीरात लडाखमधील बाटलिक सेक्टरमध्ये आज मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होऊन एक लष्करी छावणी कोसळलेल्या हिमकड्याखाली गाडली गेली. यात पाच जवान अडकले असून त्यापैकी दोन जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. हिमकड्याखाली गाडले गेलेल्या सैनिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी येथे एक खास प्रशिक्षित पथक तैनात केलेले आहे. या पथकाने त्वरित कार्यवाही केल्याने दोन जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात rयश आले. उर्वरित तीन जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवरून सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या