खर्चावर हमीभाव आणि शेतकऱ्यांना ५ हजार पेंशन मिळावी!

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हमीभावाचा मुद्दा उचलून धरला आहे. माहिती अधिकार कायदा लागू झाल्यामुळे ६ मंत्री व चारशे अधिकारी भ्रष्टाचारमुळे घरी बसले आहेत. नवीन ३८ कायदे मंजूर झाले. दोन सरकार बदलले तरी भ्रष्टाचार कमी होत नसून तो वाढतच चालला आहे. या सरकारने अनेक आश्वासने दिली परंतु लोकपाल बिलाची अंमलबजावणी केली नसल्याने भ्रष्टाचारास आळा बसू शकला नाही, असा आरोप अण्णा हजारे केला आहे. ते पंढरपूरय येथे बोलत होते.

शेतकऱ्यांना ६० वर्ष पूर्ण होताच शासनाने ५ हजार रुपये पेंशन द्यावी यासाठी ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. शेतीमालाला हमी भाव नसल्याने शेती आणि शेतकऱ्यांची घडी विस्कटली असून यामुळे मागील २२ वर्षात १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनाने स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतीमालाला खर्चावर आधारित भाव मिळावा याच्या जनजागृतिसाठी देशभर दौरे करून २३ मार्च रोजी या प्रश्नावर दिल्लीत आंदोलन करणार आहे, असे आण्णा हजारे यांनी सांगितले. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील सदभावना बहुउद्देशिय सेवा मंडळाच्या वतीने येथील विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या मान्यवारांचे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

सरकारने सत्तेत येण्याअगोदर जनतेला खोटी अश्वासने देऊन फसवून भूलभुलैय्या केला आहे. भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींची जास्त काळजी आहे, असेही यावेळी अण्णा म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या