
शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून युवासेना आणि शिवसेनेच्या वतीने मुंबईसह राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, छत्रीवाटप, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान अशा विविध उपक्रमांना विभागातील नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिवसेना दिल्ली प्रदेशप्रमुख मंगतराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली प्रदेश आणि उत्तर भारत कार्यालयाच्या आवारात आणि दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमधील उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवसेना दिल्ली प्रदेशचे अर्जुन जैन, केशव उपाध्याय, दीपक पवार उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्र. 204 च्या वतीने माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या सहकार्याने ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करून त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, माजी आमदार दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, गजानन चव्हाण, पराग चव्हाण, सुधीर साळवी, सचिन पडवळ उपस्थित होते.
माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या संकल्पनेतून व मुंबई महापालिकेच्या सुशोभीकरण योजनेतून दहिसर (पश्चिम) येथील ‘झेप घेणाऱया वाघा’च्या शिल्पाचे अनावरण शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, विनायक सामंत, विधानसभा संघटक अविनाश लाड, गौरी खानविलकर, शाखाप्रमुख अक्षय राऊत, अतुल तावडे, दीपा चुरी, रमेश ठाकूर आदी उपस्थित होते.
शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय कदम यांनी 100 उपशाखाप्रमुखांच्या माध्यमातून अंधेरी परिसरात 100 भगवे झेंडे फडकवत भगवा झंझावात आणला. डी. एन. नगरमधील अष्टविनायक सोसायटीसमोर युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्या हस्ते भगवा फडकवण्यात आला.