अवयवदानाबद्दल ‘चित्र’जागृती

149

वर्षा फडके

अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी राज्यपातळीवर अभियान हाती घेण्यात आले आहे. अवयवदानाचे महत्त्व चित्ररूपात कळावे यासाठी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात अवयवदान या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात अवयवदान या विषयावर चित्रकार सूरज कटारे यांनी काही चित्रे रेखाटली आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद..

varsha-phadake-article-1

अवयवदान दिनानिमित्त काय सांगाल ?
राज्य शासनामार्फत अवयवदानाविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि अवयवदान मोहिमेत जास्तीत जास्त लोकसहभाग वाढावा या दृष्टीने नुकताच २९ ऑगस्ट रोजी अवयवदान दिवस साजरा करण्यात आला. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही अवयवदानविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि या मोहिमेत मला चित्रकलेमुळे सहभागी होता आले याचा आनंद आहे.

 मंत्रालयामध्ये भरविण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात आपली चित्रे मांडण्यात आली आहेत याविषयी…
अवयवदान असा विषय घेऊन मी भरविण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात १४ चित्रे मी काढली आहेत. मूत्रपिंड (किडनी), नेत्रदान, हृदयदान कसे करता येईल हे मी चित्रांच्या माध्यमातून मांडले. तर एका चित्रात डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानाविषयी मार्गदर्शन करीत आहेत. तर अवयवदान करण्यात कोणतीही जात, धर्म, वर्ण, लिंग असा भेदभाव नसतो. अवयवदान करीत असताना नेमके काय करावे लागते, रुग्णाला समजवून सांगणारे चित्र, अवयवदानाचे महत्त्व पटवून देणारे चित्र, नेत्रदानासंदर्भातील चित्र तसेच जिवंतपणी करता येण्यासारखे अवयवदन याविषयीची वेगवेगळी चित्रे मी या प्रदर्शनात मांडली आहेत.

या प्रदर्शनासाठी आपण काय वेगळी तयारी केली आहेत?
मुळातच अवयवदान हा जनजागृतीचा विषय घेऊन वेगवेगळी चित्रे आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून मांडायची हे माझ्यासमोर एक आव्हानच होते. पण जेव्हा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मला याबाबत सांगितले तेव्हा एका आव्हान म्हणून आणि एक सामाजिक जबाबदारी म्हणून मी हे काम करण्याचे ठरविले. साधारण एक महिन्याच्या कालावधीत मी १४ चित्रे काढली. ऍक्रेलिक ऑन कॅनव्हान्सच्या माध्यमातून मी सर्व चित्रे साकार केली असून साधारण ३ बाय ४ फुटांची चित्रे साकारली आहेत.

आपण जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चे विद्यार्थी आहात याविषयी…
मी सन २०१२ ते २०१६ या काळात जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये शिकलो. मुळात पोर्ट्रेट हा माझा विषय. तर व्हॅन गॉग, पिकासो आणि अमृता शेरगील यांना मी आदर्श मानतो. त्यांनी काढलेली चित्रे, त्यातून देणारा संदेश यामुळे मी प्रेरित आहे.

यापुढील काळात आपण आपली चित्रे जनजागृतीसाठी वापरणार आहात का?
आज मी अवयवदानासाठी चित्रे काढली आहेत. पण यापुढील काळात मी कुष्ठरोग या रोगाविषयीची माहिती आणि बचावासाठी काय करावे याबाबतची माहिती माझ्या चित्रातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळातच चित्रातून आपल्याला लोकांपर्यंत आपल्या भावना थेट पोहोचवता येतात असे मी मांडतो. चित्र खूप बोलके असते आणि चित्रातून आपल्याला नेमका संदेश देता येतो आणि त्यामुळे माझ्या चित्रातून अधिकाधिक जनजागृती आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न यापुढील काळातही राहणार आहे. अवयवदान ही एक लोकचळवळ होणे आवश्यक आहे. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनातून अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मी केला आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या