उत्सव साजरा करताना समाजभान हवे

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्याची मुहूर्तमेढ रोवली. तो साजरा होऊ लागला. गणेशोत्सवातून स्वातंत्र्यप्राप्तीचा संदेश मिळायचा. त्यातून पुढची दिशा ठरायची. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गणेशोत्सव अधिक जोमाने होत गेले. कालांतराने उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. मुंबईत कालचा गणेशोत्सव आणि आजच्या गणेशोत्सवात वेगळंपण जाणवू लागलं. मंडळांची संख्या वाढू लागली. सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे आणि उभारणीसाठी मंडळ विचार करू लागले.

व्यावसायिक रंगभूमीवरचे सध्याचे आघाडीवरचे नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी नेहरूनगरचा राजा याचा जो सभामंडप उभारलेला आहे. या कामाविषयी सांगतानाच बंद्रे यांनी ‘सध्याच्या गणेशोत्सवाचे स्वरूप काल आणि आज’ यावर आपले मत व्यक्त केले. संदेश बेंद्रे म्हणाले, गणेशोत्सवात कालांतराने व्यावसायिकता आणि मार्केटिंग आले हे आपल्याला नाकारताच येणारं नाही. मुंबई- पुणे येथे कितीही पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा होत असला तरी तेथेही तेच आहे. त्यात सोशल मीडियाचा वापर जास्त आहे. बिल्डरांकडून देणगी मिळविण्यासाठी मंडळांमध्ये स्पर्धा आहे. काळाच्या ओघामध्ये ते होतंच राहणार आहे. मूळ तत्त्व जे होतं ते मात्र सांभाळलं पाहिजे. मी जिथे राहतो तिथं अनेक वर्ष गणपतीचे डेकोरेशन करीत आलोय. 20 वर्षांच्या पद्धतीनेच चालायचं तसं नाही होणारं. फक्त त्याचा अतिरेक होता कामा नये. मंडळांमध्ये चढाओढ दिसून येते. टाळ, झांजा वाजवत आम्ही गणपती आणायचो आणि विसर्जन करायचो आता डीजे लागतो.

डेकोरेशनसाठी होणाऱया अमाप खर्चाबद्दल बेंद्रे म्हणाले, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काय लागतं? गणेशाची मूर्ती, दोन वेळची पूजा, आरती आणि नैवेद्य यांना फार खर्च येत नाही. कार्यक्रमामुळे खर्च वाढलेला आहे. तसेच काही मंडळ मिरवणुकीसाठी दोन ते तीन लाख खर्च करतात तर काही सात लाख. पुण्यातील गणेशोत्सव मुंबईपेक्षा जरा वेगळे भासलेत. त्यांच्या सजावटीत चलचित्र जास्त प्रचलित आहेत. मिरवणुकीत ढोल-ताश्यांवर जास्त त्यांचा पगडा असतो. मुंबईत सजावटीच्या अनेक स्पर्धा होत असल्यामुळे सामाजिक विषयांवरच्या सजावटीवर जास्त भर असतो. त्यामुळे खर्च वाढतो.

तसं पाहिलं गेलं तर सजावटीच्या सामानासाठी अनेक निर्बंध आलेले आहेत. विशेष करून थर्माकोलवर. यंदाच्या गणेशोत्सवात थर्माकोलच्या मखरी आणि ते वापरून केलेली सजावट तशी कमी दिसली. नाही म्हटलं तरी चालेल. बेंद्रे म्हणाले, खरं सांगू का, यावर भाष्य करणं मला फार महत्त्वाचं वाटतंय. कारण थर्माकोलवर बंदी आल्यावर त्याच्यापासून मखर करणाऱया कारागिरींवर आणि त्याचा व्यवसाय करणाऱया मंडळींची रोजीरोटी बंद झालेली आहे. 80 टक्के थर्माकोल पॅकेजिंगसाठी खुला आहे त्याला बंदी नाही, मग फक्त 20 टक्के जो थर्माकोल सजावटीसाठी वापरला जात होता त्याला बंदी का? हा माझा सरकारला सवाल आहे. करायची तर 100 टक्के थर्माकोलला बंदी करावी.

संजय कुळकर्णी