घाबरायला मी ब्राह्मण आहे का?; राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बेताल वक्तव्य

55

लातूर – सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली आता बंद झालेली आहे, त्यामुळेच काही जणांनी आंदोलन केले. पंरतु ते आंदोलन माझ्या माघारी झाले, माझ्या समोर झाले असते तर मी मुस्काट फोडले असते. मी त्यांना भ्यायला काय ब्राह्मण आहे का? मी मागासवर्गीय आहे, अशी थेट धमकी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लातुरात दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

लातुरात सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आलेल्या राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बोलताना सांगितले की, नांदेड येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर शासनाच्या आणि मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्याचा संदर्भ घेऊन ते म्हणाले की, विकासकामात राजकारण करायचे नाही ही भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. सामाजिक न्याय विभागातील दलाली बंद करण्याचे काम आपण केलेले आहे. दलाली बंद झाल्यामुळेच बदनामीसाठी आंदोलन केले जात आहे. माझ्यासमोर हे आंदोलन झाले असते तर मी मुस्काट फोडले असते. मी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी घाबरणारा नाही आणि घाबरायला मी काही ब्राह्मण नाही, मी मागासवर्गीय आहे असेही त्यांनी म्हटले होते.

पालकमंत्री संभाजी पाटील यांनी मात्र त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आज होळी आहे त्यामुळे मंत्री जे काही बोलले ते कोणी मनावर घेऊ नये. त्यांच्या भाषणात निलंगा इफेक्ट आहे पण तो इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते, असेही संभाजी पाटील यांनी म्हटले. मात्र या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू असून सोशल मीडियावर हा विषय अधिक चर्चिला जात आहे.

म्हणे अधिक काळजी घेतली पाहिजे!

मी अनवधानाने बोललो, कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. आमदार रमेश कदम यांचे कार्यकर्ते आंदोलन करत होते त्यांना उद्देशून मी बोललो. त्यामागे दुसरा कोणताच उद्देश नव्हता. ते वक्तव्य मी मागे घेत असल्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. यापुढे सार्वजनिक ठिकाणी बोलताना अधिक काळजी घेतली पाहिजे. हा विषय येथेच थांबवावा, अशी विनंती त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या