स्त्रीद्वेषी मजकूर हटवा, TikTok सारख्या समाजमाध्यमांना गृहमंत्र्यांची सक्त ताकीद

1285

सावित्रीबाई फुलेंचा वारसा जोपासणाऱ्या या महाराष्ट्रात कोणत्याही स्त्रीला असुरक्षित, नकारात्मक वाटता कामा नये. यासाठी सायबर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच स्त्रीद्वेषी मजकूर हटवा असे म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी TikTok सारख्या समाजमाध्यमांना सक्त ताकीद दिली आहे. एसिड हल्ल्याचे व बलात्काराचेे समर्थन करणाऱ्या टिक-टॉक वरील व्हिडीओबद्दल प्रतिक्रिया देताना गृहमंत्र्यांनी वरील विधान केले. यावेळी स्त्री सुरक्षितता गृहमंत्रालयाची एक प्रमुख प्राथमिकता आहे, अशी त्यांनी ग्वाही दिली.

गृहमंत्र्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर सेलला सायबर गुन्हे करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याचेही अनिल देशमुख यांनी नमूद केले. पोलिसांकडून CrPC कलम 149 अन्व्ये समाजकंटकांना नोटिसा दिल्या जाणार असल्याचंंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासना बरोबर समन्वय साधून काम करीत आहे. ते टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सामाजिक माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे, असं अनिल देशमुख म्हणाले. तसेच लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल शाबासकीही दिली.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण 400 गुन्ह्यांची (ज्यापैकी 18 N.C आहेत) नोंद 19 मे 2020 पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 170 गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 158 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टिक टॉक व्हिडीओ शेअर प्रकरणी 18 गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 7 गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 43 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 213 आरोपींना अटक केली आहे. यापैकी 102 आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून लॉकडाऊन व कोरोना महामारीच्या संधर्भात विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. सदर गुन्हे हे मुख्यतः टिकटॉक व्हिडीओ बनविणे, सोशल मीडियावर वेगवेगळी भडकावू पोस्ट टाकणे, कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणाऱ्या पोस्ट्स टाकणे, कोरोना महामारीबद्दल चुकीची माहिती देणे, कोरोनाग्रस्तांची नावे जाहीर करणे, विविध राजकीय नेत्यांची बदनामी करणारे खोटे पोस्टर्स/फोटोज टाकणे, त्यांच्यावर हीन दर्जाची व‌ वयक्तिक टीका करणे, सर्व साधारण नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणे इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे. सदर वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र सायबर सेलला मार्गदर्शन केले व सदर गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आदेशित केले.

सायबर गुन्हे करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या लोकांना याद्वारे सूचित करण्यात येते कि, त्यांनी असे गुन्हे केल्यास त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860, माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 व अन्य कायद्यांद्वारे सदर व्यक्ती विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. असे गुन्हे रोखण्यासाठी आरोपीस फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 (Criminal Procedure Code 1973) कलम 149 अन्व्ये व्यक्तिगतरित्या खालील प्रमाणे नोटिस पाठवून कठोर कारवाई केली जाईल, असं देशमुख म्हणाले.

गृहमंत्र्यांनी टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सामाजिक माध्यमं हिंदुस्थानात चालवणाऱ्या कंपन्यांनाही ताकीद दिली. स्त्रीद्वेषी व सामाजिक तेढ निर्माण करणारी सामग्री व मजकूर आपल्या प्लॅटफॉर्मवरुन त्वरीत काढून टाकावी व अशा समाज कंटक व्यक्तींवर कायमची बंदी घालावी. त्यांच्या देशातील प्रतिनिधिंशीही गरज भासल्यास या बद्दल चर्चा केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या