भरधाव कारच्या धडकेत महिला जखमी, चोवीस तासांनंतर पोलीस पुत्रावर गुन्हा दाखल

रस्ता ओलांडणाऱया महिलेला भरधाव कारने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अपघाताचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी चालक असलेल्या पोलीस पुत्रावर गुन्हा दाखल केला.

रेखा जिवाराम चौधरी (40, रा. बोऱहाडेवाडी, मोशी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती जिवाराम चौधरी (44, रा. बोहाडेवाडी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. विनय विलास नाईकरे (23, रा. प्रेस्टीन ग्रीन सोसायटी, मोशी) या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या पत्नी रेखा आणि मुलगी बुधवारी दुपारी स्वराज रेसिडेन्सीसमोर रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी आरोपी चालवत असलेल्या भरधाव कारने रेखा यांना धडक दिली. यात त्या काही फूट उंचावर उडून रस्त्यावर पडल्या. नागरिकांनी तत्काळ त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. रेखा याच्या डोळय़ाला गंभीर दुखापत झाली असून पंबरेचे हाड मोडले आहे. तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

पोलीस पुत्र असल्याने विलंब

कारचालक असलेल्या आरोपीचे वडील विलास नाईकरे हे पोलीस दलात नोकरीला असून सध्या एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातच त्यांची नियुक्ती आहे. अपघातानंतर 24 तास उलटूनही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

अपघातानंतर पोलीस रुग्णालयात गेले होते, मात्र त्याचे नातेवाईक फिर्याद देण्यास नकार देत होते. त्यामुळे गुरुवारी दुपारी महिलेचे पती पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

z गणेश जामदार (वरिष्ठ निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे)