मुंबईची माणसं…….. समाज घडवणारी सेवा

<< दीपेश मोरे >>

mumbai-cha-manus3

घरची आर्थिक परिस्थिती समाधानकारक. तसं म्हटलं तर कशाला हवी दुनियादारी. कुटुंबापुरतंच जगायचं असाच विचार कुणीही करील, पण काहींना असं जगणं मान्य नसतं. त्यांच्या रक्तातच समाजसेवा भिनलेली असते. अशी माणसं कधीच स्वत:पुरती जगत नसतात. समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड असते. दहिसरमधील असंच आशीष आणि अश्विनी साखळकर दाम्पत्य. एकीकडे खासगी क्लासेसवाले कौन्सिलिंगच्या नावाखाली लाखो रुपये फी उकळत असताना अश्विनी मुला-मुलींना मोफत मार्गदर्शन करतात. विनामूल्य संस्कार वर्ग भरविणे, आदिवासी पाडय़ातील वनवासी कल्याण केंद्रांना भेटी देऊन आर्थिक तसेच अन्य मदत करणे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना विशेषत: मुलींना सल्ल्याची गरज भासते.

अश्विनी शिक्षिका तर आशीष आयसीआयसीआय बँकेत नोकरीला. घरी मुलगी आणि सासरे असल्याने अश्विनी शिक्षिकेची नोकरी करीत नसल्या तरी घरातच शिकवणी घेतात, पण यातून वेळात वेळ काढीत अश्विनी आणि आशीष समाजासाठी, समाजातील गरीब मुलांसाठी काही ना काही उपक्रम राबवीत असतात. अश्विनी यांच्या मते सध्या मुलांचा आय क्यू म्हणजेच बुद्धय़ांक झपाटय़ाने वाढतोय; पण ई क्यू म्हणजेच भावनांकाचे काय? मुलांच्या भावनिक संवेदना मेल्या आहेत. मुलं दगड बनत आहेत. अश्विनी यांच्या बोलण्यात तथ्य आहे म्हणूनच तर ई क्यू आणि आय क्यूच्या नावाखाली खासगी क्लासेसवाले भरपूर फी घेतात, पण अश्विनी मुलांचे काऊन्सिलिंग मोफत करतात. घरकाम करणाऱया महिला, रिक्षावाल्यांपासून सर्वसामान्य कुटुंब ते अगदी सधन कुटुंबातील मुले अश्विनी यांच्याकडे येतात. मोफत सल्ला कुणाला नको. त्यामुळे अश्विनी यांच्याकडे मुंबईचेच नव्हे तर मुंबईबाहेरून मुले येत असतात. विशेष म्हणजे अश्विनी यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे आपल्या मुलामध्ये सकारात्मक बदल झाल्याची पोचपावती देण्यासाठी पालकांचे फोन येतच असतात.      समुपदेशनाबरोबरच अश्विनी या घरातच संस्कार वर्ग चालवितात आणि तेही मोफत. मंत्र, श्लोक पठण, बुद्धिमत्ता वाढविणारे खेळ, स्मरणशक्ती आदींचा संस्कार वर्गात समावेश असतो. आशीष आणि अश्विनी यांनी पुढाकार घेऊन आपल्या मित्रमंडळींसोबत हिंदू नववर्ष स्वागत समिती बनवली आहे. या समितीच्या माध्यमातून  साखळकर दांपत्याने आदिवासी पाडय़ातील मुलांचे शिक्षण, त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

तलासरी येथील एक वनवासी केंद्रातील मुलांना कपडे, आर्थिक मदत तसेच इतर शैक्षणिक मदत अश्विनी आणि आशीष समितीच्या माध्यमातून करीत असतात. विशेष म्हणजे आदिवासी पाडय़ातील मुलांच्या मदतीसाठी दत्तक पालक योजना अनेकांसमोर मांडतात. त्यांची ही संकल्पना अनेकांना आवडते आणि बऱयाच दानशूर व्यक्तींनी ही संकल्पना स्वीकारली आहे. शस्त्रांचे प्रदर्शन, किल्ले बनविण्याची स्पर्धा, शोभायात्रा यांचे आयोजन करून संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठीदेखील त्यांची धडपड सुरू असते. अश्विनी या मुंबईतच नव्हे महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मोफत समुपदेशन करतात.

काऊन्सिलिंगसाठी खासगी क्लासेस बरीच फी उकळतात. मग तुम्ही का नाही घेत असे विचारले असता, अश्विनी म्हणाल्या, सगळंच पैशाने विकत घेता येत नाही. श्रीमंतांची मुले फी भरू शकतात, पण सर्वसामान्य आणि गरीबांची मुलांची फी भरण्याची ताकद नसते. शिवाय आपण जे समाजाला देतो, त्यातून जेव्हा चांगले काही निर्माण होते व चांगला समाज घडतो. हे पाहण्याचे समाधान अनमोल असते. ते पैशात मोजणे शक्य नाही.