कंत्राटदाराकडून सरकारी तिजोरीला कोट्यवधीचा गंडा

38

सामना प्रतिनिधी । हिंगोली

बेकरी उद्योग उभारून मागासवर्गीयांचे भले करण्याच्या नावाखाली कळमनुरी तालुक्यातील येलकी येथे भारती मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करून राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून प्राप्त झालेल्या १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी संस्थेचे अध्यक्ष विजय रणवीर, संचालक विरेंद्र आठवले व सातारा जिल्ह्यातील कंत्राटदार हनमंत चवरे यांनी हडप करून सरकारी तिजोरीला गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहकारी संस्थेच्या उपलेखा परीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमनुरी तालुक्यातील येलकी शिवारात विजय उत्तम रणवीर व विरेंद्र काशीनाथ आठवले यांनी भारती मागासवर्गीय औद्योगिक संस्था संचालकांच्या मदतीने स्थापन करुन बेकरी उद्योग उभारण्याचे ठरविले होते. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून मंजुरी मिळवली होती. तसेच या संस्थेची नोंदणी देखील केली होती. बेकरी उत्पादन प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाने ६ कोटी ९९ लाख ९५ हजारांचा हा प्रकल्प मंजूर केला. तसेच शासनाने ५० लाख रुपये भागभांडवल व ५० लाख रुपये दीर्घ मुदतीचे कर्ज असे एकूण १ कोटी रुपये संस्थेच्या भारतीय स्टेट बँक शाखा डोंगरकडाच्या खात्यामध्ये वर्ग केले. या खात्यात जमा झालेली रक्कम प्रकल्पाचे बांधकाम करण्यासाठी १९ ऑक्टोबर २०११ ते २९ मार्च २०१२ या कालावधीत संस्थेचे अध्यक्ष विजय उत्तम रणवीर व संचालक विरेंद्र काशीनाथ आठवले यांनी उचलली. तसेच रोख व धनादेशाव्दारे बांधकाम कंत्राटदार हनुमंत चौरे यांना ९९ लाख ८८ हजार रुपये देण्यात आले. मात्र, १५ जानेवारी २०१८ पर्यंत दिलेल्या रक्कमेऐवढे बांधकाम संबंधित कंत्राटदाराने पूर्ण केले नाही. तसेच संस्थेच्या कॅशबुक मध्ये ६ लाख रुपयांच्या चुकीच्या नोंदी करुन अपहार व गैरव्यवहार केल्याचेही लेखा परीक्षणात समोर आले. कळमनुरीच्या सहकारी संस्था कार्यालयातील उपलेखा परीक्षक सुधाकर हंबर्डे यांनी याबाबत शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात विजय रणवीर, विरेंद्र आठवले व सातारा येथील गुत्तेदार हनुमंत चवरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीने हिंगोलीत मोठी खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या