हार फुलांऐवजी गणपतीला वही, पेन अर्पण करा ; विघ्नहर्ता गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम

159

राजेश देशमाने, बुलढाणा

नेहमीच सामाजिक उपक्रम राबविणार्‍या चिखलीच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाने यावर्षी गणपतीसमोर विठ्ठल दर्शनाचा आकर्षक देखावा केला आहे. तसेच हा देखावा पाहण्यासाठी येणार्‍या भक्तांना गणपतीला हार, फुले, प्रसाद अर्पण करु नका तर एक वही पेन अर्पण करा असे आवाहन या मंडळाने केले आहे. भक्तांनीही या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत हजारो वह्या पेन गणपतीसमोर अर्पण केले आहे. गणपती समोर आलेले वह्या पेन हे मंडळ गरजू व गरीब शालेय विद्यार्थ्यांना वाटप करणार आहे.

चिखली येथे गेल्या सात वर्षापासून खामगाव चौफुलीवर काही युवकांनी एकत्र येत विघ्नहर्ता गणेश मंडळाची स्थापना करुन दरवर्षी वेगवेगळे देखावे करणे व सामाजिक उपक्रम राबविणे सुरु आहे. या मंडळाने गेल्या सात वर्षात अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप केले आहे. तसेच अनेक गरीब अपघातग्रस्तांना आर्थिक मदत केली आहे. त्याच प्रमाणे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये दिले आहे असे कितीतरी सामाजिक उपक्रम हे मंडळ राबविते. यावर्षी मंडळाचे अध्यक्ष राजेश सराफ व त्यांचे सहकारी सागर खलसे, प्रविण वायाळ, मुकेश पडघान, प्रफुल देशमुख, शिवराज पाटील, अभिजित राजपूत, राजु हाडगे, बाळासाहेब हाडगे, आतोले, सुहास शेटे, कपील खेडेकर या तरुणांनी विठ्ठल दर्शन हा अप्रतिम देखावा गणपतीसमोर उभा केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी व गणपती दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भक्तांना गणपती ही विद्येची देवता असून गणपतीला हार, फुले आणू नका तर एक वही पेन अर्पण करा अशी सूचना बाहेर फलकावर लावली आहे. भक्त ही सूचना पाहून वही पेन गणपती चरणी अर्पण करत आहे. हजारो वह्या पेन गोळा झाल्या आहे.

गणपती विसर्जनानंतर मंडळ हे वह्या पेन गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन वाटणार आहे. हार, फुले हे नाशवंत असून ते काही तासाने खराब होऊन फेकून द्यावे लागतात. परंतु गणेश चरणी अर्पण केलेले वह्या पेन गरीब विद्यार्थ्यांना कामी येणार आहे व श्री गणेश विद्येची देवता असून मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतू होवून अप्रतिम प्रतिसाद मिळत असल्याचे मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सामनाशी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या