अहमदाबादमधल्या ‘त्या’ भिंतीविरोधात उपोषण सुरू

644
gujrat-wall-us-donald-trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिंदुस्थानातील दौऱ्यादरम्यान अहमदाबादला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ आणि इंदिरा ब्रिज या भागात असलेल्या जवळपास 500 झोपड्या ट्रम्प यांना दिसू नयेत म्हणून या झोपड्यांभोवती 7 फूट उंच भिंत उभारली जात आहे. अहमदाबादमधील या भिंतीची दखल आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये एक आघाडीचं नाव असलेल्या ‘इंडिपेंडन्ट’ या वृत्तपत्रानेही घेतली आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरात त्याची चर्चा सुरू असून तिथे राहणाऱ्या लोकांनी आता याविरोधात उपोषणास सुरुवात केली आहे. केरळच्या सामाजिक कार्यकर्त्या अश्वती ज्वाला यांनी शरणीव्यास झोपडपट्टीसमोर उभारण्यात आलेल्या भिंतीजवळ उपोषण सुरू केले आहे. स्थानिकांनी त्यांना साथ दिली आहे.

अश्वती ज्वाला यांनी द हिंदूसोबत बोलताना सांगितले की, ‘वृत्तपत्रांमधून त्यांना या भिंतीबद्दल माहिती मिळाली. हे वृत्त अत्यंत धक्कादायक होतं. या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या समर्थनात उपोषणाचा निर्णय घेतला.’

यानंतर ज्लाला यांनी इथल्या झोपडपट्टीला भेट दिली. त्यांच्यासोबत चर्चा केली. तेव्हा त्यांना कळाले की पोलिसांनी या परिसरातील लोकांना धमकावले आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या या लोकांसोबत जो प्रकार सुरू आहे तो अत्याचारापेक्षा कमी नाही. याउलट इथे राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

अहमदाबाद नगरपालिकेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी मोटेरा स्टेडियमजवळ राहणाऱ्या 45 कुटुंबांना जागा खाली करण्याच्या नोटीसा धाडल्या आहेत. त्यामुळे या कुटुंबांवर ऐनवेळी घर सोडण्याचं संकट आलं आहे. अहमदाबाद महापालिकेने मात्र हे आरोप फेटाळले असून ट्रम्प यांच्या दौऱ्याचा याचा कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या भिंतीचा देखील ट्रम्प यांच्या दौऱ्याशी कोणताही संबंध नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ट्रम्प हे 24 फेब्रुवारीला हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार असून ते अहमदाबादला भेट देणार आहेत. त्यांच्यासाठी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या शहरात मोठ्याप्रमाणावर कामं सुरू असून अनेक ठिकाणी रंगरंगोटी देखील सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या