लग्नासाठी मुलींवर समाजाचा दबाव, ही दुर्दैवी बाब ; सत्र न्यायालयाने व्यक्त केली चिंता

635

लग्न नाही केले तर समाज आपणाला विचारणार नाही, मान मिळणार नाही, अशी भीती मुलींना अजूनही भेडसावतेय. मुलींवरचा हा दबाव हिंदुस्थानी समाजातील दुर्दैवी बाब आहे, अशी चिंता सत्र न्यायालयाने नुकतीच एका प्रकरणात व्यक्त केली. बलात्काराच्या खटल्यात न्यायालयाने या गंभीर वास्तवावर बोट ठेवले.

2007 मध्ये मुंबईतील तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील 51 वर्षांच्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. सी. शेंडे यांनी 10 वर्षे सश्रम तुरुंगवास ठोठावला. हा निकाल देतान न्यायालयाने लग्न न करणार्‍या मुलींना समाजात कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागतेय, यावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, घटना घडली त्यावेळी आरोपी वधूवर सूचक केंद्र चालवायचा, तर पीडित तरुणी ही टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करायची. आरोपी ज्योतिषसुद्धा सांगायचा. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो उपाय सुचवायचा. पीडित तरुणी ही गरीब कुटुंबातील होती. ती नोकरीला लागून काही दिवस उलटले होते. त्यानंतर तिने आरोपीला स्वतःचे लग्न न जुळण्यामागील अडचणी सांगितल्या. त्याचाच गैरफायदा घेत आरोपीने भूतबाधा हटवायचे सांगून तरुणीला मंतरलेली राख खायला दिली व ती बेशुद्ध होताच तिच्यावर बलात्कार केला, असे सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले. त्यावर बचाव पक्षाच्या वकिलांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने ज्योतिषाला शिक्षा सुनावली.

आपली प्रतिक्रिया द्या