जेएनपीटीच्या भरावामुळे घारापुरी किनार्‍याची धूप

47

उरण– जेएनपीटी बंदराच्या समुद्रातील वाढत्या भरावांच्या कामांमुळे समुद्रातील पाण्याची पातळी मोठया प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे जागतिक कीद्धर्तीच्या घारापुरी बेटावरील सागरी किनारपट्टीचे बांध-बंदिस्ती, संरक्षक तट सागरी लाटांमुळे पार उद्ध्वस्त झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी बेटासभोवार समुद्र किनार्‍यांवर संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही सरंक्षक भितींचे काम झाले नसल्याने बेटावरील चहूबाजूंच्या सागरी किनार्‍यांची मोठया प्रमाणात धूप होत चालली आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी किनारपट्टीची पातळी सोडून १० मीटर आत घुसू लागले असून बेटाच्या अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण झाली असून याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे.
जेएनपीटी बंदराची उभारणी १९८९ करण्यात आली तेव्हापासून बंदराचा विकासाच्या नावाखाली आणखी दोन बंदरे खासगीकरणातून उभारण्यात आली आहेत. त्यानंतर बंदरातील सर्वाधिक लांबींचे तसेच क्षमतेचे चौथे बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या विविध बंदरांच्या उभारणीसाठी समुद्रात मोठया प्रमाणात दगड-मातीचे भराव केले आहेत. समुद्रात होत असलेल्या प्रचंड भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढतच चालली आहे. परिणामी समुद्राचे पाणी सागरी किनार्‍यांचे उल्लंघन आणि किनार्‍यावरील बांध-बंधिस्ती संरक्षक तट उद्ध्वस्त करीत बेटांवरील गावांच्या दिशेने सरकू लागले आहे.जेएनपीटीच्या या कामामुळे पर्यावरणाची होत असलेल्या हानीबाबत तक्रारी प्रापत झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस.एच.पडवळ नवी मुंबई यांनी २३ जानेवारी २०१७ रोजी जनसुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे. या जनसुनावणी दरम्यान प्रकल्प आणि पर्यावरणाबाबत तक्रारी, सूचना, टीका टिपणीवर चर्चा केली जाणार आहे. या जनसुनावणीला अनुसरून शिवसेनेचे उपविभागप्रमुख तथा घारापुरी ग्रा.पं.सदस्य बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या