उरणच्या जंगलामध्ये समाज कंटकच लावताहेत वणवे

101

सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा

उरणमधील जंगलामध्ये वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हे वणवे समाजकंटकच लावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अवैधपणे प्राण्यांची शिकार करणारे. वनविभागातून, डोंगरातून माती चोरणारे माती माफिया, जंगलातील झाडे तोडणाऱ्या व्यक्ती अशा प्रकारचे वणवे लावत आहेत. यामुळे वन्यजीवां बरोबरच उरणच्या डोंगराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी चिरनेरच्या इंद्रायणी डोंगराला अचानक वणवा लागल्यांने नेहमी हिरवागार दिसणारा डोंगर आत्ता काळाकुट्ट दिसत आहे. चिरनेरचा पुर्व भाग हा डोंगर दऱ्यांचा भाग असून या ठिकाणी जंगल आहे. या जंगलात मोर, डूक्कर, भेकर, ससे अशा अनेक प्रकारचे वन्यजीव आढळून येतात. या प्राण्यांची शिकार करण्यासाठी अनेकजण या जंगलात येतात. या प्राण्यांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी समाज कटंक जंगलच पेटवतात. यामुळे जीवाच्या भीतीने दाट झुडुपात लपलेले हे प्राणी बाहेर येतात व सहजच जाळ्यात सापडतात.
चार वर्षापूर्वी चिरनेरच्या पुर्व भागातील कलम डोंगराला लागलेल्या वणव्यात चिरनेरमधील एक महिला होरपळून मरण पावली होती. या प्रकारानंतर वन विभागाने या भागात करडी नजर ठेवून वणवे लागण्याचे प्रकार थांबविले होते. मात्र या वर्षी जानेवारी महिना उजाडल्यानंतर परत एकदा अशा प्रकारे वणवे लागण्याच्या प्रकारात वाढ झाली असून हे वणवे विझवताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना नाकी नऊ आले आहे.

दरम्यान अशा प्रकारच्या वणव्यांमुळे जंगल बेचिराख होत असून नागरीकानींच आता दक्ष राहून असे प्रकार रोखायला हवे. आमच्याकडे अतिशय कमी कर्मचारी असल्यामुळे सर्वत्र पहारा करता येत नाही. असे प्रकार करताना कोणी आढळून आला तर त्याच्यावर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येईल. असे उरण वनक्षेत्र अधिकारी बी.डी. गायकवाड यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या