सोलापूर,अक्कलकोटही पळवण्याचा कर्नाटकचा डाव, बोम्मईंची फडणवीसांवर टीका

सांगलीतील जत तालुक्यावर कर्नाटकची वक्रदृष्टी पडली असून जतमधील 40 गावांवर आम्ही दावा सांगणार आहोत, असे खळबळजनक विधान कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. या 40 गावांपाठोपाठ सोलापूर आणि अक्कलकोट हा महाराष्ट्र -कर्नाटक सीमेलगतचा भागही कर्नाटकात यावा असे विधान बोम्मई यांनी केले आहे. 40 गावांवर दावा सांगणाऱ्या विधानानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. जतमधील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. याउलट सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढा लढून बेळगाव, कारवार, निपाणी आम्ही मिळविणार, असे नमूद करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले होते. त्यांच्या या उत्तरावरून बोम्मई यांनी फडणवीस यांनाही टीकेचे लक्ष्य केले आहे.

बोम्मबई यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंबंधी चिथावणीखोर विधान केले आहे. त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आमचे सरकार हे देशाची भूमी, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहे, त्यामुळे सीमाभागातील जिल्ह्यांमधील एक इंचही जागा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आमची मागणी आहे की महाराष्ट्रातील कर्नाटक भाषिक प्रदेश सोलापूर आणि अक्कलकोट हा कर्नाटकात सामील व्हावा. 2004 सालापासून महाराष्ट्राने सीमावादासंबंधी सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केली आहे, मात्र त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. आम्ही आमची कायदेशीर लढाई अधिक बळकट करत आहोत. “