धक्कादायक! सोलापूरात होम क्वारंटाईन केलेल्या आशा स्वयंसेवीकेला अमानवी वागणूक

1031

सोलापुरातील न्यू बुधवार पेठ येथे राहणाऱ्या आशा स्वयंसेवीकेला होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र त्यांच्यासोबत अमानवी वागणूक होत असल्याचे समोर आले आहे. आजूबाजूची लोक वाईट वागणूक देत असल्याचा आरोप आशा स्वयंसेवीका पूजा थडसरे यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सूरज थडसरे या घशात त्रास होत असल्याने 30 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालय येथे औषधोपचारासाठी गेल्या. तपासणी नंतर डॉक्टरांनी त्यांना 14 दिवस घरी राहण्यासाठी होम क्वारंटाईनचा हातावर शिक्का मारले. रुग्णालयातून घरी आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या हातावरील शिक्का पाहिला आणि पूजा यांना कोरोनाची लागण झाल्याची आवई उठवली. तसेच त्यांना घर सोडून जाण्यास बळजबरी केली. लोकांच्या त्रासाला कंटाळून त्या विजापूर रोड येथे माहेरी गेल्या मात्र तेथेही लोकांनी हेटाळणी केली. शेवटी कंटाळून त्या तुळजापूर रोडवर राहणाऱ्या मावशीच्या घरी गेल्या. मात्र तेथील लोकांनी देखील अमानवी वागणूक देत त्यांना हाकलून लावले. लोकांच्या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी जोडभावी पोलीस चौकीला तक्रार दाखल करण्याचे ठरवले.

पोलिसांनी दखल न घेतल्याने त्या पती आणि दोन मुलांना घेऊन रस्त्यावर आल्या. या नंतर त्यांनी आशा स्वयंसेविका युनियनच्या पुष्पा पाटील यांना संपर्क साधून व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यांनी सिटूचे महासचिव अँड. एम एच शेख यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पीडितेची आणि कुटुंबाची दत्त नगर येथील समाजमंदिर येथे राहण्याची सोय करायला सांगितले. माजी नगरसेविका नसीमा शेख व अनिल वासम यांनी त्यांना भोजनाची व्यवस्था करून दिली. मात्र याचा राग आल्याने लोकांनी नसीमा शेख व अनिल वासम यांच्या घरी आणि कार्यालयात राडा केला. अखेर पोलीस बोलावून गर्दी पांगवण्यात आली.

दुसऱ्या दिवशी आडम मास्तर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सोलापूर महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे, कारंजे यांच्याशी दूरध्वनीवरून सल्लामसलत करून नॉर्थकोट येथे त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु एक आशा स्वयंसेवीका ज्या इतरांच्या आरोग्याची काळजी घेतात त्यांना या समाजाकडून वाळीत टाकल्या सारखी वागणूक मिळते तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित होत असून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या