दक्षिण, उत्तर सोलापूर, सांगोला, माळशिरस कोरोनामुक्त

जिल्हय़ात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यातून दिलासादायक बाब म्हणजे माळशिरस, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व सांगोला तालुक्यातील नागरी भाग आज कोरोनामुक्त झाला आहे. तर, अक्कलकोट व मंगळवेढा तालुक्यांतील कोरोना रुग्णांची संख्या दोन अंकीवर आल्याने जिल्हय़ातील या सहा तालुक्यांची कोरोनाच्या बाबतीत आश्वासक वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.

सोलापूर जिल्हा चार महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांमध्ये टॉप पाचमध्ये होता. गेल्या आठवडय़ापासून कोरोनाचे संक्रमण व रुग्णांची संख्या कमालीची घटत आहे. सध्या जिल्हय़ात नागरी विभागात 861 आणि ग्रामीण भागात 2251 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालात नागरी विभागातील माळशिरस, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर भागात एकही रुग्ण आढळला नाही. सांगोल्यात फक्त एका रुग्णावर उपचार चालू आहे. माढा व मंगळवेढय़ातील नागरी भागात अवघ्या 30 रुग्णांवर उपचार चालू आहेत. याशिवाय अक्कलकोट तालुक्यात 56, मंगळवेढा 36, दक्षिण सोलापूर 23 व उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात अवघे चार रुग्ण आहेत.

जिल्हय़ातील या सहा तालुक्यांत झपाटय़ाने कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे काही दिवसांतच हे तालुके कोरोनामुक्त होतील. सध्या बार्शी तालुक्यात 702, करमाळा 472, तर पंढरपूर तालुक्यात 444 रुग्णांवर उपचार चालू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या