
सोलापूर महापालिकेने मिळकतकर आकारणी रचनेत बदल केला असून, नव्याने बांधकाम केलेल्या इमारतीची मालमत्ता आकारणी कारपेट क्षेत्राऐवजी बिल्टअप क्षेत्रावर निर्धारित केला जाणार आहे. पूर्वी आकारल्या जाणाऱया दराच्या तुलनेत पाच टक्के अधिक मिळकतकराचा बोजा नव्या इमारतींना बसणार आहे. यापूर्वी घरातील पार्किंग, जीना, पोर्च, शौचालय, बाथरूम क्षेत्राला करात असलेली सूट बंद होणार आहे. भिंतीचे क्षेत्र मोजणीत दहा टक्के गृहीत धरले जात होते, ते पंधरा टक्के धरले जाईल. कर आकारणीचा हा आदेश महापालिका आयुक्त पुढील आठवडय़ात काढण्याची शक्यता आहे.
सोलापूर महापालिका उपसमितीच्या बैठकीत कररचनेतील बदलांचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर शहरातील इमारत कर आकारणीत 2005 नंतर बदल झालेला नाही. महापालिका आयुक्त 2005 पूर्वीच्या इमारतींना नवीन कर आकरणी करत मिळकतकराची नोटीस दिली होती. नागरिक, राजकीय पक्षांकडून विरोध झाला होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दिलेल्या 55 हजार नोटिसा मागे घेण्यात आल्या होत्या. आता नव्याने आकारणी सुरू करण्यात आली आहे.
भिंतीलाही आकारणार कर
सोलापूर महापालिका यापूर्वी भिंत क्षेत्राची वाढ दहा टक्के पकडून त्या खोलीची मोजणी गृहीत धरण्यात येत होती. ती 10 ऐवजी 15 टक्के वाढ गृहीत धरली जाणार आहे. भिंतीलाही कर आकारला जाणार आहे. जुनी आकारणी आणि नवीन आकारणी यात 10 टक्के फरक दिसून येणार आहे. मागील काळात आकारणी केलेल्या मिळकतीस पाच हजार रुपये कर येत असेल, तर नवीन आकारणीनुसार त्यास पाच हजार 250 रुपये आकारणी होईल, असे सांगण्यात आले. जागेचा एरिया, बांधकाम यावर आकारणी अवलंबून राहणार आहे.
भिंत क्षेत्राला 10 ऐवजी 15 टक्के वाढ गृहीत धरून पुढील आकारणी करण्यात येणार आहे. सवलत बंद करण्यात येणार आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर आकारणी होईल.
– श्रीराम पवार, सहायक आयुक्त, सोलापूर मनपा.
मागील काळात 10 टक्के क्षेत्रास, तर 50 टक्के सवलती या सभागृहातील ठरावानुसार दिल्या. आयुक्तांनी नव्याने पाच टक्के भिंती क्षेत्रास कर सवलत बंद केली तर धोरणात्मक निर्णस असे घेता येणार नाहीत. कोणत्या नियमाच्या आधारे आकारणी केली जाते, ते सांगावे. नागरिकांवर बोजा वाढवण्याचा हा प्रकार आहे ते योग्य नाही.
– प्रभाकर जामगुंडे, माजी नगरसेवक.